शिवसेनेच्या १२ खासदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. गटनेता बदलावा असं पत्र आज या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं आहे. राहुल शेवाळे यांची निवड त्यांनी गटनेता म्हणून केला आहे. यावेळी संजय राऊत यांच्यावर एक गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केला.
ADVERTISEMENT
संजय राऊत यांच्याविषयी काय म्हणाले आहेत राहुल शेवाळे?
भाजप आणि शिवसेना यांची युती होण्याची चर्चा सुरू झाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युतीसाठी तयारही होते. मात्र खासदार संजय राऊत यांनी युतीत खोडा घातला असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी केला. युती करण्यात यावी यासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो होतो. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यातही एक तास चर्चा झाली होती.
उद्धव ठाकरे तसंच पंतप्रधानर नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाल्यानंतर आमची एक बैठक पार पडली. त्या बैठकीत अरविंद सावंत, संजय राऊत उपस्थित होते. यावेळी मलाही युती करायची आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तसंच तुम्हीही युतीसाठी प्रयत्न करा, असं ठाकरे यांनी सांगितलं होतं. मात्र संजय राऊत आणि त्यांनी केलेली वक्तव्यं युतीत खोडा घालणारी ठरली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही युती करण्याबाबत फारसा प्रतिसाद दिला नाही असंही शेवाळे यांनी सांगितलं.
जेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार गेले तेव्हाही उद्धव ठाकरे यांनी सगळ्या खासदारांना वर्षावर बोलावलं. त्या बैठकीतही आम्ही हे उद्धव ठाकरे यांना सांगितलं की आमदारांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. भाजपसोबत आपण जायला हवं. जर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार असतील तर आमदारांची भूमिका मान्य करायची तयारी आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं शेवाळे यांनी म्हटलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे सगळं म्हणजे कॉमेडी एक्स्प्रेस सिझन २ आहे, असं म्हटलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘दुसरं कुणी बोललं असतं तर आम्ही नक्कीच दखल घेतली असती. जे बोललेत त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही ते अशीच बडबड करत असतात. मॅटनी शो सध्या बंद झाला आहे,’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला. तसंच त्यांच्या बोलण्याला काय महत्त्व द्यायचं, असंही म्हटलं आहे.
ADVERTISEMENT