महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी मला धमकी देण्यात आली होती. तसंच मी जर ऐकलं नाही तर तुमचा लालूप्रसाद यादव करू असंही मला धमकावण्यात आलं होतं. साधारण महिन्याभरापूर्वी ही घटना घडली असा लेटरबॉम्ब आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टाकला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात ईडीसारख्या तपासयंत्रणांचा कसा गैरवापर केला जातो याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच पत्रात त्यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला धमकी देण्यात आली. सुमारे महिन्याभरापूर्वी हा प्रकार घडला होता. महाराष्ट्रातलं सरकार पडलं की मध्यावधी निवडणुका लागतील. तसंच मी जर ऐकलं नाही तर तुमची अवस्था लालूप्रसाद यादव यांच्यासारखी केली जाईल अशी धमकीही देण्यात आली. मी जर या सगळ्याला नकार दिला तर मला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असंही धमकावण्यात आलं. एवढंच नाही तर महाराष्ट्रातले दोन बडे मंत्रीही खडी फोडायला जाणार आहेत असंही धमकावण्यात आलं. मी या सगळ्याला भीक घातलेली नाही असं संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.
‘ईडीसारख्या तपासयंत्रणांचा भाजपकडून गैरवापर’ संजय राऊत यांची उपराष्ट्रपतींकडे तक्रार
आणखी काय म्हणाले आहेत संजय राऊत?
मी आणि माझ्या कुटुंबीयांनी अलिबागमध्ये थोडी जमीन घेतली आहे. ही जमीन आम्ही 17 वर्षांपूर्वी खरेदी केली आहे. ही जमीन साधारण एक एकर आहे. आता मी ज्यांच्याकडून जमीन घेतली त्यांनाही धमक्या दिल्या जात आहे. ईडी च्या कारवाईची धमकी दिली जाते आहे. माझ्या विरोधात बोला असं त्यांना सांगितलं जातं आहे. त्यांना यासाठी काही पैसेही देण्यात आले आहेत. साम दाम दंड भेद अशा सगळ्या नीती वापरून भाजप शिवसेनेचं सरकार अस्थिर करू पाहतं आहे असा अत्यंत गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
मी माझं राजकीय करिअर तीन दशकांपूर्वी सुरू केलं. मी सुरूवातीपासून शिवसेनेत आहे. सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाराष्ट्रात सत्ता आहे. तसंच 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची भाजपसोबत युती होती. 25 वर्षात दोनदा शिवसेना-भाजप युतीचं सरकारही आलं आहे. काही वैचारिक मतभेदांमुळे आम्ही वेगळे झालो.
मात्र आम्ही भाजपपासून वेगळे झाल्यानंतर ही बाब समोर येते आहे आहे की भाजपकडून शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी अत्यंत पद्धतशीर, नियोजनबद्धरित्या ईडीसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो आहे. शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं आहे. फक्त खासदारच नाही तर शिवसेनेच्या आमदारांनाही ठरवून टार्गेट केलं जातं आहे. शिवसेनेत आहेत म्हणून ईडीतर्फे चौकशी केली जाते आहे. काही ना काही आरोप करून चौकशीचा ससेमिरा लावला जातो आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांनी हे पत्र उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लिहिलं आहे.
ADVERTISEMENT