मुंबई: शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुंबईत शनिवार (18 डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन शिवसेना मंत्री अनिल परब यांच्याविरुद्ध तुफान टीका केली. मात्र, यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. सुभाष देसाईंना मंत्रिपद दिलं आणि आपल्याला नाकारलं याबाबत आपल्या मनात नाराजी असल्याचं रामदास कदमांनी जाहीरपणे सांगितलं.
ADVERTISEMENT
काही महिन्यांपूर्वी रामदास कदम यांची अनिल परबांविरोधातील एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. तेव्हापासून शिवसेनेत त्यांच्याविरोधात वातावरण तयार झालं आहे. अशावेळी रामदास कदम हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेने देखील जोर धरला होता. याच सगळ्याबाबत खुलासा करण्यासाठी रामदास कदम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि अनेक गोष्टींचा खुलासा केला.
याच पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या मनात नेमकी काय खदखद आहे ही देखील बोलून दाखवली. पाहा रामदास कदम नेमकं काय म्हणाले.
‘सुभाष देसाईंना मंत्रिपद दिलं याचं मला वाईट वाटलं’
‘एक गोपनीय गोष्ट होती ती तुम्हाला सांगतो. शिवसेना भवनात मी स्वत: उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. साहेब, रामदास कदम, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई आमचं आता 70 च्या आसपास वय झालं आहे. आम्हाला मंत्रिपदं देऊ नका. तुम्ही नवीन लोकांना मंत्रिपदं द्या आपल्या.
‘मला साहेब म्हणाले नक्की? मी म्हटलं हो साहेब नक्की.. माझी तयारी आहे. पण ज्यावेळेस मंत्रिपदाची लिस्ट आली तेव्हा सगळ्यात आधी नाव सुभाष देसाईचं होतं. मला वाईट वाटलं ते.’
‘माझं मन मुद्दाम मी मोकळं करतोय आज. मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी नाराज नाही. मी मंत्रिपद मागितलंच नाही. पण सुभाष देसाईंना देताय आणि मला नाही म्हणता.. म्हणून मला वाईट वाटलं त्याचं. द्या ना तुम्ही मंत्रिपदं नवीन मुलांना..’
‘याच गोष्टीचं मला जास्त दु:ख झालं. शेवटी पक्षप्रमुखांचा आदेश हा शिरसावंद्य आहे मला. कुठेही त्यात दुमत नाही.’
‘मी पुन्हा एकदा सांगतो.. प्रस्ताव असा ठेवला होता की, मी, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई आता आमची वयं झालेली आहेत. आता आम्हाला बाजूला ठेवा तिघांनाही आणि नवीन लोकांना संधी द्या. असा प्रस्ताव मी ठेवला होता.’
‘गद्दार अनिल परब आहे मी नाही..’, शिवसेना नेते रामदास कदमांची तुफान टीका
‘उद्धव साहेब हो म्हणाले. पण जेव्हा यादी आली पण सगळ्यात आधी नाव सुभाष देसाईंचं आलं शपथविधीसाठी पहिल्या दोन मध्ये. त्याचं थोडसं दु:ख झालं मला. मी खोटं कशाला बोलणार, आहे ते आहे.’ असं म्हणत रामदास कदम यांनी आपल्या मनातील खदखद जाहीरपणे व्यक्त केली.
ADVERTISEMENT