दिल्लीचे महसूल खात्याचे मुख्य सचिव संजीव खिरवार (sanjeev khirwar) आणि सनदी अधिकारी (IAS) असलेल्या त्यांच्या पत्नी रिंकू दुग्गा (rinku dugga) यांची गुरूवारी केंद्र सरकारने (Central Govt) बदली केली. आयएएस संजीव खिरवार आणि रिंकू दुग्गा हे त्यांच्या पाळीव कुत्र्यासह स्टेडियममध्ये फिरायला जायचे. त्यामुळे स्टेडियम रिकामं केलं जायचं, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.
ADVERTISEMENT
दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरायला घेऊन येणाऱ्या आयएएस अधिकारी संजीव खिरवार आणि त्यांच्या पत्नी आयएएस रिंकू दुग्गा यांना केंद्राने गुरूवारी दणका दिला. आयएएस दाम्पत्याची गुरूवारी बदली करण्यात आली.
IAS संजीव खिरवार यांची केंद्र शासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये, तर त्यांची पत्नी IAS रिंकू दुग्गा यांची अरुणाचल प्रदेशमध्ये बदली करण्यात आली आहे. मुख्य सचिवांनी गुरूवारी अहवाल सुपूर्द केल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने ही कारवाई केली.
एका प्रशिक्षकाने असं म्हटलं होतं की, ‘पूर्वी खेळाडू रात्री ८ ते ८.३० वाजेपर्यंत सराव करायचे. पण, आता त्यांना सायंकाळी ७ वाजताच स्टेडियम रिकामं करायला सांगितलं जातं. कारण तिथे IAS अधिकारी त्यांच्या कुत्र्यासोबत फिरायला येतात. यामुळे आमच्या प्रशिक्षण आणि दैनंदिन सरावात अडथळे निर्माण होतं आहे.’
1994 च्या बॅचचे IAS अधिकारी असलेल्या संजीव खिरवार यांनी त्यांच्यावर करण्यात आलेला आरोप फेटाळून लावला. आपण अधूनमधून स्टेडियमवर कुत्र्याला फिरायला घेऊन जायचो, मात्र त्यामुळे खेळाडूंच्या सरावावर कोणताही परिणाम होत नव्हता.’
दिल्ली सरकारच्या ताब्यात असलेलं त्यागराज स्टेडियम २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेसाठी तयार करण्यात आलं होतं. या प्रकरणशी ‘आज तक’ने स्टेडियमचे प्रशासक अजित चौधरी यांच्याशी संवाद साधला.
त्यांनी सांगितलं की, ‘पूर्वी स्टेडियमची वेळ ४-६ वाजेपर्यंत अशी होती. वाढते तापमान आणि गरमीमुळे ती वाढवून ७ वाजेपर्यंत करण्यात आली. सात वाजेनंतर स्टेडियममध्ये IAS अधिकारी येतात याची माहिती आपल्याला नाही. कारण ७ वाजता आपण निघून जायचो.’
समोर आलेल्या माहितीनुसार IAS संजीव खिरवार मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास स्टेडियममध्ये कुत्र्यासोबत आल्याचं बघितलं गेलं. त्यांचा कुत्रा रेसिंग ट्रॅक, फुटबॉल मैदानावर फिरताना दिसला. या कुत्र्याला सुरक्षा रक्षकही थांबताना दिसले नाही.
किरण बेदी संतापल्या
किरण बेदी यांनी IAS संजीव खिरवार आणि रिंकू दुग्गा यांच्या बदलीवरून प्रश्न उपस्थित केला आहे.
‘जर आयएएस अधिकारी स्टेडियममध्ये कुत्रा घेऊन फिरताना दिसत असल्याचं स्पष्ट झालं आहे, तर मग त्यांना दुसऱ्या केंद्र शासित प्रदेशात का पाठवलं जात आहे? निर्णय येईपर्यंत त्यांना सुट्टीवर का पाठवलं जात नाहीये. भारतीय प्रशासकीय सेवा कुठेही गांभीर्यपूर्ण सेवा आहे.’
ADVERTISEMENT