ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. माजीवडा-मानपाडा विभागाच्या सह आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला करुन त्यांची बोटं छाटली आहेत.
ADVERTISEMENT
या हल्ल्यात पिंपळे जखमी झाल्याअसून त्यांच्यावर घोडबंदर परिसरातील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपळे यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकालाही या हल्ल्यात इजा झाल्याचं कळतंय. या घटनेनंतर अवैध फेरीवाल्यांच्या मुजोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अमरजीत यादव असं या हल्लेखोर फेरीवाल्याचं नाव असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली असून त्याच्या जवळचा चाकूही पोलिसांनी हस्तगत केला आहे. हा हल्ला एवढा भयावह होता की घटनास्थळी असलेल्या आजूबाजूच्या नागरिकांना देखील मनात घडकी भरली होती, तर उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी दुरूनच फोटो, व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली.
आरोपी अमरजीत यादव हा मुळचा बिहारचा असून तो ठाण्याच्या ब्रम्हांड परिसरात राहतो. याआधीही ३ वर्ष अगोदर अमरजीतने अशाच प्रकारे हल्ला केला होता. आरोपी कासारवडवली पोलिसांच्या अटकेत असून पोलीस पुढील कारवाई करत असल्याचं कळतंय.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे तसेच फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले तसेच हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकामार्फत प्रभाग समितीनिहाय अनधिकृत फेरीवाले, हातगाड्यांवर धडक कारवाई सुरु असून शहरात विविध ठिकाणी कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे. दरम्यान घोडबंदर रोड येथे सोमवारी संध्याकाळी अशीच कारवाई सुरू असताना सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे याच्यावर अमरजीत यादव या भाजीवाल्या विक्रेत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची तीन बोटे छाटली गेली असून गंभीर दुखापत झाली आहे. तर सुरक्षारक्षकाच्या एका बोटाला दुखापत झाली आहे.
ADVERTISEMENT