–राकेश गुडेकर, रत्नागिरी
ADVERTISEMENT
मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने कोकणाला झोडपून काढलं आहे. जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम असून, हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात ७ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा होताना दिसत असून, सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीही कमालीची वाढ झालेली आहे.
जिल्ह्यातील 4 नद्या इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत. मंगळवारी (५ जुलै) दुपारी 12 वाजता आलेल्या अहवालानुसार खेड तालुक्यातील जगबुडी नदीची इशारा पातळी 5 मीटर इतकी आहे, मात्र सध्याची जगबुडी नदीची पाणीपातळी 5.95 मीटर इतकी पोहचली आहे.
संगमेश्वरमधील शास्त्री नदीची इशारा पातळी 6.20 मीटर आहे, मात्र सध्या शास्त्री नदीची पाणीपातळी 6.50 मीटरवर गेली आहे. लांजा तालुक्यातील काजळी नदीची इशारा पातळी 16.50 मीटर असून, प्रत्यक्षात काजळी नदीची सध्याची पाणीपातळी 17.340 मीटरवर पोहोचली आहे.
Rain Live updates : निर्मला नदीने धोक्याची पातळी ओलांडली, सिंदुदुर्गमध्ये 27 गावांचा संपर्क तुटला
राजापूर तालुक्यातील कोदवली नदीची इशारा पातळी 4.90 मीटर असून, सध्या स्थितीत कोदवली नदीची पाणीपातळी 5.70 मीटरवर गेली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास, या नद्या धोका पातळी ओलांडण्याची भीती आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 157 मिमी पावसाची नोंद झाली आहे. लांजा तालुक्यात सर्वाधिक 342 मिमी, मंडणगडमध्ये 205 मिमी, संगमेश्वरमध्ये 210 मिमी, चिपळूणमध्ये 169 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. तसेच मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट बंदच
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्यानं सोमवारपासून (४ जुलै) घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
आजही वाहतूक बंदच आहे. सुरक्षेच्या कारणास्तव घाटातील वाहतूक ४ जुलैच्या सायंकाळपासून बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून चिरणी- कळंबस्ते मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.
कराड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटातही दरड कोसळली आहे. घाटात एकेरी वाहतूक सुरू असून, दरड बाजूला करण्याचं काम सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीये.
चिपळूणमध्ये एनडीआरएफची तुकडी
गेल्यावर्षी चिपळुणमध्ये महापुराने हाहाकार उडाला होता. शहरात पाणी शिरल्याने घरं पाण्याखाली गेली होती. शहरातील अनेक भागात पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचलं होतं. यात प्रचंड नुकसान झालं होतं. सध्या चिपळूणमध्ये पाऊस कोसळत असून, पुराचा धोका सध्यातरी दिसत नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने एनडीआरएफची तुकडी तैनात केली आहे.
ADVERTISEMENT