अनैतिक संबंध सुरु असतानाच वृद्ध महिलेने ठोठावला दरवाजा, आरोपीने केली हत्या

इम्तियाज मुजावर

• 05:36 AM • 18 Sep 2021

सातारा: भिक्षा मागणे, पडेल ते काम करणे, सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून सर्वांना आपलेसे करुन आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत करणार्‍या एका 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना सातारा (Satara) जिल्ह्यातील येलमरवाडी येथे घडली आहे. अनैतिक संबंधांमध्ये (Immoral relationships) अडथळा ठरल्याने या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनैतिक संबंधाला अडथळा ठरल्याने […]

Mumbaitak
follow google news

सातारा: भिक्षा मागणे, पडेल ते काम करणे, सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून सर्वांना आपलेसे करुन आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत करणार्‍या एका 70 वर्षीय वयोवृद्ध महिलेची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना सातारा (Satara) जिल्ह्यातील येलमरवाडी येथे घडली आहे. अनैतिक संबंधांमध्ये (Immoral relationships) अडथळा ठरल्याने या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

अनैतिक संबंधाला अडथळा ठरल्याने हिराबाई दगडू जगताप (वय 70) या वृद्धेचा डोक्यावर भीषण प्रहार करून तिची हत्या केल्याची घटना येलमरवाडी (ता. खटाव) येथे 12 सप्टेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी वडूज पोलिसांनी संगीता गणपत देशमुख आणि तुळशीराम सखाराम बागल (दोघे रा. येलमरवाडी ता. खटाव) यांना अवघ्या बारा तासांच्या आत अटक केली होती. याच प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवार (12 सप्टेंबर) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हिराबाई या गावातील बाळकृष्ण पोळ यांच्या घरासमोर पडलेल्या काही लोकांना दिसल्या. बराच वेळ झाला तरी त्या जागच्या हालत नसल्याने स्थानिकांनी जवळ जाऊन पाहणी केली असता त्या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या आढळून आल्या.

यावेळी हिराबाई या मृतावस्थेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे स्थानिकांनी या घटनेची माहिती हिराबाई यांचे भाचे गौतम नलवडे यांना कळवली. नलवडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि याप्रकरणी वडूज पोलिसांना तात्काळ माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखत सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालय वडूज येथे पाठवला.

दुसरीकडे या घटनेबाबत पोलिसांनी गावात चौकशीला सुरुवात केली. मृत हिराबाई या गावात भिक्षा मागून खात असल्याने त्यांचे कोणासोबत वैर असण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे संशयितांचा शोध घेण्याबरोबरच गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान पोलिसांचे एक पथक तक्रार दाखल करून घेत होते तर दुसरे पथक येलमरवाडीत तळ ठोकून होते. यावेळी आरोपी तुळशीराम बागल हा सतत पोलिसांवर नजर ठेवून होता. ही गोष्ट पोलीस अधिकारी देशमुख यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही. त्यांनी तात्काळ बागल याला ताब्यात घेतलं.

बागल याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी आपणच वृद्ध महिलेची हत्या केल्याची कबुली आरोपी बागल याने पोलिसांना दिली.

नेमकी घटना काय घडली?

घटनेच्या दिवशी आरोपी तुळशीराम बागल व त्याची प्रेयसी संगिता देशमुख यांच्यात अनैतिक संबंध सुरू असतानाच हिराबाई या भिक्षा मागण्यासाठी त्यांच्या घरासमोर आल्या आणि वारंवार दरवाजा ठोठावू लागल्या. त्यामुळे रागाच्या भरात तुळशीरामने दरवाजा उघडून थेट हिराबाई यांना दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलीसांनी सोमवारी सायंकाळी आरोपीची प्रेयसी संगीता देशमुख हिला देखील अटक केली.

‘देवकर कुछ तो गडबड है’

येलमरवाडीसारख्या शांत गावात खुनाची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस गावात माहिती घेत असतानाच आरोपी बागल हा पोलीस तपासाची माहिती अंधारात एका बाजूला बसून ऐकत होता. नेमकी हीच गोष्ट पोलीस अधिकारी देशमुख यांनी हेरली. त्यांनी तात्काळ पोलीस अंमलदार दीपक देवकर यांना उद्देशून म्हणाले की, ‘देवकर कुछ तो गडबड है’,

अनैतिक संबंध… प्रेयसीची हत्या आणि मास्टरमाईंड प्रियकर, पुण्यातील नेमकं प्रकरण आहे तरी काय?

याचवेळी त्यांनी देवकर यांना नजरेनेच इशारा करुन बागल याला ताब्यात घ्यायला सांगितलं. वरिष्ठांचा इशारा मिळताच देवकर यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांसह पुढे सरसावून तुळशीराम बागल याच्या मुसक्या आवळल्या. ज्यानंतर या संपूर्ण हत्या प्रकरणाचा झटपट उलगडा झाला.

    follow whatsapp