सातारा जिल्ह्यासह अवघ्या पश्चिम महाराष्ट्राला मागील तीन दिवसापासून पावसाने झोडपून काढलं आहे. यावेळी कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर नवजा आणि कोयना येथे मुसळधार विक्रमी पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कायम असून गुरुवार सायंकाळपासून शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत धरणात दहा टीएमसी पाण्याची भर पडली आहे. त्यामुळेच धरणाचे वक्री दरवाजे प्रथमच दोन फूट उघडण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
यावेळी दरवाजातून प्रतिसेकंद 9567 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याचवेळी पाहता वीजगृहातून प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर कायम असल्याने कोयना धरणाच्या वक्री दरवाजातून सकाळी दहा वाजता प्रतिसेकंद 25 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. त्यामुळेच कोयना नदीसह कृष्णा तसेच अन्य नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवारी सायंकाळी पाच वाजता कोयना धरणात 72.88 टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. सायंकाळनंतरही पावसाचा जोर कायम असल्याने रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास धरणातील पाणीसाठा 78 टीएमसीहून अधिक झाला होता. शुक्रवारी सकाळी हाच पाणीसाठा 82.98 टीएमसीवर पोहचला होता.
मागील सहा तासांचा विचार करता कोयना धरणात प्रतिसेकंद सरासरी 74 हजार 531 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. मात्र मागील चोवीस तासातील धरणात येणाऱ्या पाण्याची सरासरी प्रतिसेकंद आवक ही 2 लाख 67 हजार 529 क्युसेक इतकी झाले आहे. यावरूनच गुरुवारी दिवसभरात महाबळेश्वर नवजासह कोयना आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाची कल्पना येते.
कोयनानगर येथे तब्बल 610 मिलिमीटर पाऊस झाला असून नवजा येथे 746 मीटर पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वर येथे 556 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत अगोदरच मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यातच आता कोयना धरणाचा पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू होणार असल्याने कृष्णा तसेच कोयना नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Rain: Satara जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, कोयना धरणातील पाणीसाठा प्रचंड वाढला; चिपळूण-कराड मार्गावर पाणी
सातारा जिल्ह्यात कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. संगम माहुली गावातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने येथील असलेल्या महादेव मंदिराच्या पायथा आणि कैलास स्मशान भूमीच्या पायऱ्या पाण्याखाली बुडाल्या आहेत. सततच्या पावसामुळे नदीकिनारी पूरसदृश परस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून प्रशासनाने नदी नदीलागतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT