विदर्भात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं पुन्हा थैमान सुरू असताना आता नागपुरातही रूग्ण वाढत आहेत. नागपुरात सलग पाचव्या दिवशी कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. आज समोर आलेल्या अहवालात नागपुरात १११६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहर आणि जिल्ह्यात मिळून १३ मृत्यूंची नोंद मागील चोवीस तासांमध्ये झाली आहे. शहरात ९ तर ग्रामीण भागात २ तर जिल्ह्याबाहेरील २ मृतांचा यामध्ये समावेश आहे.
ADVERTISEMENT
रूग्ण संख्या वाढू लागल्याने चार दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले. तरीही रूग्णसंख्येत वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर नागपूर जिल्ह्यात सर्वात जास्त रूग्ण हे गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात आढळले होते. सप्टेंबरमधले अनेक दिवस पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे होती. त्या कालावधीत मृत्यूंचं प्रमाणही वाढलं होतं. मात्र यानंतर या सगळ्यात घट होत संख्या कमी झाली होती. त्यामुळे प्रादुर्भाव कमी होईल असे वाटत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये रोज ५०० ते ७०० च्या घरात पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत.
आज नागपुरात १११६ पॉझिटिव्ह रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मंगळवारी अकरा हजारांपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या. तर गुरूवारीही १० हजार ६११ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये शहरात ८२६ जण तर ग्रामीण भागात २८८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.
ADVERTISEMENT