काबूल: अफगाणिस्तान (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) ताब्यात गेल्यापासून तेथील परिस्थिती ही सतत बिघडत चालली आहे. येथील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन भारत सरकारने (Indian Government) तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना (Indian Citizens in Afghanistan) मायदेशी आणण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांनी, एएनआय या वृत्तसंस्थेला अशी माहिती दिली आहे की, भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोबमास्टर विमानाने 120 हून अधिक भारतीय अधिकाऱ्यांना घेऊन काबूलहून उड्डाण केले आहे. या लोकांना रात्री उशिरा विमानतळाच्या सुरक्षित भागात आणून नंतर इथून बाहेर काढण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
त्याचवेळी, सूत्रांनी सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये अनेक भारतीय आहेत, ज्यांना आता पुन्हा भारतात परतण्याची इच्छा आहे. सध्या ते हिंसाचार झालेल्या भागातून दूर सुरक्षित ठिकाणी पोहचले आहेत. एक-दोन दिवसात सरकार त्यांना सुरक्षितपणे भारतात आणणार आहे. यासाठी एक विशेष विमान पाठवलं गेलं आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांची संख्या सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर केलेली नाही.
रविवारी रात्री देखील एक विमान काबूलला पोहोचलं होतं आणि तिथून काही भारतीयांना घेऊन सोमवारी सकाळी भारतात परतलं आहे. त्याच वेळी, आता दुसरं विमानही 120 जणांना घेऊन परतत आहे. लवकरच हे विमान देखील भारतात येणार आहे. सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, ही विमानं काबूलमध्ये अनेक फेऱ्या मारणार असून ते तिथे अडकलेल्या भारतीयांना माघारी घेऊन येण्याचं काम करणार आहे.
भारतीयांच्या मदतीसाठी ‘अफगाणिस्तान सेल’
याआधी सोमवारी भारत सरकारने अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीमध्ये आपल्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करेल असे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, ‘परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी इतर बाबींसाठी एक विशेष ‘अफगाणिस्तान सेल’ स्थापन केला आहे. येथे असलेल्या भारतातील लोकांशी संपर्क वाढवण्यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देखील जारी करण्यात आला आहे.’
दरम्यान, यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, ‘अफगाणिस्तानमधील बिघडत चाललेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. भारतात परतणाऱ्या लोकांबद्दल आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.’
Who is Taliban: तालिबानी कोण आहेत, काबूल ताब्यात घेतल्याने संपूर्ण जगाला का भरली आहे धडकी?
त्याच वेळी, संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी आणि सुरक्षा परिषदेचे (यूएनएससी) अध्यक्ष, राजदूत टीएस तिरुमूर्ती म्हणाले की, ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी सोमवारी शत्रुत्व आणि हिंसाचार त्वरित थांबवावं यावर जोर दिला. कोणत्याही स्वीकारार्ह आणि वैधतेसाठी एक राजकीय समझोता असणे आवश्यक आहे. जे महिला, मुले आणि अल्पसंख्यांकांच्या मानवी हक्कांचा पूर्णपणे आदर करेल. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी ब्रीफिंगमध्ये केलेले वक्तव्य अत्यंत महत्वाचे आहे आणि परिषदेच्या सदस्यांनी स्वीकारण्याची गरज आहे.
ADVERTISEMENT