राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली. शाई फेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या प्रकरणात बारामती कनेक्शन समोर आलं असून, बारामती शहर पोलीस ठाण्यात 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद शनिवारी उमटले. पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर मनोज बरकडे या व्यक्तीने शाई फेक केली. या प्रकरणी पोलिसांनी मनोज बरकडे यांना अटक केली आहे.
चंद्रकांत पाटील शाई फेक प्रकरणात बारामतीतही 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती शहर पोलिसांनी भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. यात सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांचाही समावेश आहे.
सुषमा अंधारेंचा मोठा निर्णय; चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळे दिला सरकारच्या समितीचा राजीनामा
चंद्रकांत पाटील शाई फेक प्रकरण : बारामती कनेक्शन काय?
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून अनेक ठिकाणी पाटील यांचा निषेध करण्यात आला. बारामती तालुक्यातल्या करंजेपूल येथे शनिवारी (10 डिसेंबर) पाटील यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं.
यावेळी चंद्रकांत पाटील यांना काळे फासणाऱ्या व्यक्तीला 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊ, अशी घोषणा सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी केली होती. त्यानंतर काही तासांतच पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम आटोपून येताना चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज बरकडे याने शाई फेकली. त्यानंतर या घटनेचं समर्थन करत ऋषिकेश गायकवाड यांनी मनोज बरकडे याला 51 हजार रुपये बक्षीस देऊन त्यांचा बारामतीत भव्य सत्कार करण्यात येईल, असं सोशल मीडिया वरून जाहीर केलं.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी निषेध
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेक प्रकरणात ही माहिती कळताच बारामती भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बारामती पोलिसांनी (भादंवि कलम 53, 109, 143, 149, 504, 506) ऋषिकेश गायकवाड, मनोज गरबडे यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बारामती पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT