तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – मुख्यमंत्र्यांचं डॉक्टरांना आवाहन

मुंबई तक

• 03:06 PM • 09 May 2021

एकीकडे राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भविष्यातला धोका लक्षात घेत पुढची तयारी सुरु केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली होती. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील ७०० खासगी डॉक्टर्ससोबत ऑनलाईन संवाद साधत त्यांना येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहण्याचं आवाहन केलं. “माझा […]

Mumbaitak
follow google news

एकीकडे राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भविष्यातला धोका लक्षात घेत पुढची तयारी सुरु केली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली होती. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील ७०० खासगी डॉक्टर्ससोबत ऑनलाईन संवाद साधत त्यांना येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहण्याचं आवाहन केलं.

हे वाचलं का?

“माझा डॉक्टर” म्हणून डॉक्टर्सनी रस्त्यावर उतरावं !

“कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची आहे कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर” बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे.”

घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांकडे लक्ष हवं

मुख्यमंत्री म्हणाले, फॅमिली डॉक्टरांनीनी काळजीपूर्वक तपासणी करताना कोविड लक्षणं ओळखून त्याप्रमाणे तत्काळ उपचार सुरु केल्यास वेळीच रुग्ण बरं होण्यास मदत होईल. घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे आपण सर्व डॉक्टर्सनी लक्ष देणं, त्यांची विचारपूस करीत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे रुग्णाला मानसिक आधारही मिळतो आणि त्याची तब्येत खालावत असेल तर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करणे शक्य होतं. सर्व डॉक्टर्सनी घरी उपचार घेणाऱ्या रुग्णाला प्रोटोकॉलप्रमाणे उपचार मिळतायत किंवा नाही याकडे व्यक्तिश: लक्ष द्यावं. वॉर्ड अधिकाऱ्यांना देखील योग्य ती माहिती वेळोवेळी दिल्यास रुग्णांच्या बाबतीत पुढील व्यवस्थापन करणं पालिकेला सोपं जाईल

कोविड उपचार केंद्रांमध्येही सेवा द्या

आपल्या परिसरातील कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांना देखील सेवेची गरज असून खासगी डॉक्टर्सनी त्याठिकाणी आपली नावं नोंदवावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. राज्यात १२७० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण केला जातो, मात्र कोविडमुळे सध्या १७०० मेट्रिक टनापर्यंत आपली गरज वाढली आहे. आपण ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनण्यासाठी कमी आणि दीर्घ कालासाठीचा आराखडा तयार केला असून त्यामुळे लवकरच राज्यांतर्गत ऑक्सिजनची वाढीव निर्मिती शक्य होईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

लहान मुलांकडे लक्ष ठेवा

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात ठेऊन राज्यात बालरोग तज्ञांचा एक टास्क फोर्स निर्माण करण्याविषयी माहिती देण्यात आली. तसंच लहान मुलांमधील बदल, त्यांना होणारी सर्दी, ताप, डायरिया, दुध व अन्न खाणं कमी करणं किंवा बंद होणे अशा लक्षणांकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं सांगितलंय.

    follow whatsapp