आमच्यावर मेहरबानी करा आणि आम्हाला गरजेइतका लसींचा साठा पुरवा अशी कळकळीची विनंती केंद्राकडे केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. एवढंच नाही तर लसींचं वाटप करताना केंद्र सरकारने नेमक्या कोणत्या निकषांचा आधार घेतला आहे तेच कळत नाही असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. राज्यात सध्या दोन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा असूनही लसी पुरवल्या गेलेल्या नाहीत असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. राज्यात केवळ 3 टक्के लसींचा साठा वाया जात असून आम्हाला गरजेइतका लसींचा साठा द्यावा अशी मागणी राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा केली आहे. जालन्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
कठोर लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही
राज्यात सध्या कठोर लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही. मात्र याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. शुक्रवारी रात्रीपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संचारबंदीच्या काळात महत्त्वाचं काम असणाऱ्यांसाठी बस, रिक्षा, टॅक्सी सर्व्हिस सुरू राहणार आहे. मात्र या वाहनांमधून प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक असणार आहे असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.
रेमडेसिवीर इंजेक्शन्सची राज्यात कमतरता आहे. हा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी दर महिन्याला या या कंपन्यांकडून दीड लाख इंजेक्शन्स मिळणार आहेत अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्रात आठवडाभरासाठी लसीकरण मोहीम थांबवावी लागण्याची चिन्हं-राजेश टोपे
आणखी काय म्हणाले आहेत राजेश टोपे?
लस वाटप करण्याचे कोणतेही निकष केंद्राने ठेवलेले नाहीत. नुकतंच साडेतीन कोटींचं वाटप केंद्राने केलं आहे. त्यामध्ये गुजरातला जास्त लसी महाराष्ट्राच्या तुलनेत देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात साडेचार लाख अॅक्टिव्ह केसेस आहेत. गुजरातमध्ये केसेस 17 हजार आहेत. झारखंडलाही 28 लाख लसी देण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशात 44 लाख लसी दिल्या आहेत. मात्र महाराष्ट्राला फक्त 17 लाख लसी देण्यात आल्या आहेत. लसी वाटण्याचे निकष कुठे सर्वाधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत त्यानुसार लसींचं वाटप केलं पाहिजे. लसीकरण मोठ्या प्रमाणावर करण्याची आमची मानसिकता आहे. मात्र आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने लसी केंद्राने पुरवल्या जात नाहीत. आम्हाला केंद्राकडून नकार मिळत नाही मात्र कृतीत काहीही दिसत नाही असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT