योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात (Maharashtra) 17 ऑगस्टपासून शाळा (School) सुरू होणार नसल्याचं सरकारनकडून जाहीर करण्यात आल्यानंतर विरोधकांनी महाविकास आघाडीवर टीका सुरु केली आहे. अशावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी विरोधकांना आता उत्तर दिलं आहे. राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकणं हे योग्यच आहे. असं निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. त्या नागपूरमध्ये (Nagpur) बोलत होत्या.
महाराष्ट्रात 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने आज (12 ऑगस्ट) रोजी स्थगिती दिली आहे. टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली आणि त्याच बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
ज्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली. शाळा आणि ठाकरे सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. असं फडणवीस म्हणाले आहेत.
पाहा शाळांच्या निर्णयाबाबत निलम गोऱ्हे काय म्हणाल्या!
याचबाबत जेव्हा निलम गोऱ्हे यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या की, ‘राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकणं हे योग्यच आहे. दररोज कोरोनाचे काही ना काही नवनवीन व्हेरिएंट समोर येत आहेत. अश्यात लहान मुले बाधित झालीच तर जबाबदारी कोण घेणार?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
‘खरं तर राज्य सरकारने शाळा, संस्थाचालक, पालक यांच्यासोबत खूप चर्चा केली. परंतु जर शाळा सुरु झाल्या आणि विद्यार्थी कोरोनाने बाधित झाले तर धोका अजून वाढू शकतो. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकणं हे योग्यच आहे.’ असं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंबधी आढावा बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. ‘शाळा सुरू केल्या आणि समजा 15 दिवसांनी लहान मुलं बाधित झालीच तर जबाबदारी कोण घेणार?’ असा प्रश्न सुद्धा त्यांनी केला आहे.
‘सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला तो योग्यच आहे. कारण सरकारला विद्यार्थ्यांची काळजी आहे.’
शालेय शिक्षण विभागाने कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय घेतलेला. मात्र याच निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे.
Maharashtra Schools : 17 ऑगस्टपासून शाळा उघडण्याच्या GR ला ब्रेक, टास्कफोर्सच्या बैठकीनंतर ठाकरे सरकारचा निर्णय
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या काय म्हणाल्या?
गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य सांभाळण्यासाठी निर्णय घेतले जात आहेत. आता देखील टास्क फोर्सच्या बैठकीनंतर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. टास्क फोर्स काय म्हणालं, या संदर्भातील माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील शाळा कोरोना प्रार्दुभावामुळे मागील दीड वर्षापासून बंद आहेत. त्या उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता. 17 ऑगस्टपासून शहरी आणि ग्रामीण भागातल्या शाळा विद्यार्थ्यांसाठी उघडल्या जाणार होत्या. पण आता सरकारने टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आपला निर्णय बदलला आहे.
ADVERTISEMENT