इतनी शक्ती हमें दे ना दाता हे गाणं १९८६ साली आलेल्या अंकुश सिनेमातलं. हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आणि अजरामर आहे. मात्र इतक्या वर्षापासून लोकप्रिय असलेल्या या गाण्याच्या गायिका पुष्पा पागधरे मात्र आता विस्मृतीत गेल्या आहेत. त्यांची मात्र कोणालाच आठवण येत नाही. आणि शासनदरबारीही त्यांची उपेक्षाच होतेय. तुटपुंजी पेन्शन, वाढलेलं वय आणि राहायला हक्काचं घर नसल्याने मुंबईत पुष्पा पागधरेंची मात्र परवड होतेय.
ADVERTISEMENT
८० वर्षांच्या पुष्पा पागधरे सध्या मुंबईतील माहिम भागातील मच्छीमार कॉलनीतील आपल्या लहान घरात राहतात. गेले दीड वर्ष लॉकडाऊन सुरू असल्याने आणि कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू नसल्याने, चित्रपटगृहं, नाट्यगृहं पूर्णपणे बंद असल्याने अनेक कलाकारांचे कामाशिवाय परवड होत आहे. ८० वर्षांच्या पुष्पा पागधरेंचीही तिच अवस्था आहे. कार्यक्रम नाहीत, कोणतंही गाण्याचं रेकॉर्डिंग नाही यामुळे पुष्पा ताईंना गेले कित्येक दिवस घरीच बसून राहावं लागतंय. सरकारकडून दिली जाणारी पेन्शनही अत्यंत तुटपुंजी आहे. सध्या राज्य सरकारकडून पुष्पा ताईंना फक्त ३१०० रूपये मिळतात. इतक्या पैशात महिनाभराचं भागणं ही कठीण आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना मी पेन्शन प्रत्येक कलाकाराच्या कुवतीनुसार वाढवून देण्याची विनंती करते असं पुष्पा पागधरेंनी मुंबई तकशी बोलताना सांगितले.
तब्बल ३२ वर्षांपूर्वी पुष्पा पागधरेंना कलाकार कोट्यात सरकारने घर देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र २०२१ साल आलं तरी कलाकार कोट्यातील हे घर अद्याप पुष्पा ताईंना मिळालेलं नाही. यासाठी गेली ३२ वर्ष पुष्पाताईंनी मंत्रालयाचे उंबरठे झिजवले आहेत. अनेक राजकारण्यांनी मला मी तुम्हांला मदत करतो, अशी नुसती आश्वासनं दिली मात्र या आश्वासनांची पूर्तता मात्र एकानेही केली नसल्याचं पुष्पाताईंनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं.पुष्पा पागधरे यांनी ‘ज्योतिबाचा नवस’ या सिनेमातील ‘बाई या पाव्हण्याला, पाव्हण्याला लाजच नाही’ आणि ‘रुसला का हो मनमोहना’ या ‘आयत्या बिळात नागोबा’ सिनेमातील गाण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच २०१७ मध्ये त्यांना लता मंगेशकर पुरस्कारही मिळाला होता.
ADVERTISEMENT