कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना आजही अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन लागू आहे. या लॉकडाउनमुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतातला माल विकण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. झारखंडमधील रामगड भागात २५ वर्षीय शेतकरी रंजन कुमार माहतोलाही अशाच अडचणींचा सामना करावा लागला. लॉकडाउनमुळे शेतातली कलिंगड विकण्यासाठी अडचण येत असल्यामुळे रंजनने हा सर्व माल भारतीय सैन्याला देण्याचं ठरवलं.
ADVERTISEMENT
रंजनच्या या अडचणीबद्दल स्थानिक शीख रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांना समजलं. यानंतर भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामामुळे आज सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होताना दिसत आहे. शिख रेजिमेंटने रंजन कुमार माहतोच्या शेतातली ५ टन कलिंगड बाजारभावाप्रमाणे विकत घेतली आहेत. झारखंडमधील शीख रेजिमेंटचे स्थानिक अधिकारी ब्रिगेडीअर एम. श्री कुमार यांनी रंजन कुमारच्या शेतात जाऊन त्याला या कलिंगडांचे पैसे देऊन हा सर्व माल विकत घेतला. भारतीय सैन्याच्या या कृतीमुळे रंजन कुमार निशब्द झाला.
रांची विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलेल्या रंजनने शेती करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी शिख रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांनी रंजनच्या शेतात काम करणाऱ्या शेतमजूरांसाठी धान्य, खाण्याची पाकीट आणि काही भेटवस्तूही दिल्या. रंजनने २५ एकर शेत जमीन भाड्यावर कसण्यासाठी घेतली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याला लॉकडाउन आणि चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे सातत्याने नुकसान होत आहे. त्यामुळे या तरुणाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही त्याच्या शेतातली ५ टन कलिंगड विकत घेण्याचं ठरवलं अशी माहिती स्थानिक शिख रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना दिली.
भारतीय लष्कराच्या या मदतीमुळे रंजनला हुरुप मिळाला आहे. “लॉकडाउनमध्ये शेतातलं पिक घेण्यासाठी कोणीही येत नव्हतं. हळुहळु कलिंगडांचा काही भाग सडायला लागला. गावात तर लोक २ रुपये किलो दरानेही ही कलिंगड विकत घेण्यासाठी तयार नव्हते. आम्ही अनेकांकडून मदत मागितली पण काही फायदा झाला नाही. अखेरीस मी शेतातला हा माल भारतीय सैन्याला देण्यासाठी विनंती केली. पण लष्करी अधिकाऱ्यांनी माझ्या शेतातला माल विकत घेऊन मला नक्कीच हुरुप दिला आहे”, अशा प्रतिक्रीया रंजनने दिली. रंजनच्या शेतात सध्या ४० शेतमजूर काम करत असून कलिंगडाव्यतिरीक्त त्याने भोपळी मिरची, वांगं आणि इतर भाजीपाल्याचीही लागवड केली आहे.
ADVERTISEMENT