केंद्रीय विद्यापीठ असलेलं दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) पुन्हा एकदा चर्चेत आलं. रविवारी राम नवमीच्या दिवशी विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते भिडले. यात दोन्ही संघटनांतील काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यापीठातील कावेरी वसतिगृहात झालेल्या या वादामागे वेगवेगळी कारणं सांगितली जात आहे.
ADVERTISEMENT
विद्यापीठातील कावेरी वसतिगृहात राम नवमीची पूजा आणि मांसाहारी जेवणावरून वाद झाल्याचे परस्पर विरोधी दावे केले जात आहेत. या वादानंतर जेएनयू परिसराचे प्रवेश द्वार प्रशासनाकडून बंद करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे परिस्थिती नियंत्रणात असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, दोन्ही बाजूंनी निदर्शनं केली जात आहे.
कावेरी वसतिगृहातील नेमकं प्रकरण काय?
‘जेएनयू’मधील कावेरी वसतिगृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि डाव्या विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात झडप झाली. राम नवमी आणि इफ्तार पार्टी आयोजनावरून हा वाद झाल्याचं समोर आलं आहे. इफ्तार पार्टीमध्ये मांसाहारी जेवण होतं. याला दुसऱ्या गटाने आक्षेप घेतला होती की, पूजेच्या दिवशी जेवणात मांसाहार नको. यावरूनच दोन्ही गटात बाचाबाची झाली आणि वाद विकोपाला गेल्यानंतर मारहाण झाली.
कावेरी वसतिगृहात प्रत्येक रविवारी स्पेशल जेवण असतं, त्यात मांसाहार असतो. याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं विरोधी दर्शवला. राम नवमीच्या दिवशी मांसाहारी जेवण बनवू देणार नाही, अशी भूमिका अभाविपनं घेतल्याचं डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. तर डाव्या विद्यार्थी संघटनांनी राम नवमीनिमित्त राम पूजा करण्यास विरोध केल्याचा दावा, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
कावेरी वसतिगृहात झालेल्या वादानंतर डीन सुधीर प्रताप यांनी सर्व डाव्या संघटनांतील आणि अभाविपच्या विद्यार्थ्यांसोबत जेवण केलं. प्रकरण शांत व्हावं यासाठी सुधीर प्रताप यांनी प्रयत्न केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
दोषींवर कारवाई केली जाणार
विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. डीसीपी मनोज सी. यांनी घटनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. जेएनयूएसयू, एसएफआय, डीएसएफ आणि एआयएसए या संघटनांचे विद्यार्थी आणि अभाविपचे विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भादंवि कलम ३२३, ३४१, ५०९, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
ADVERTISEMENT