चंद्रकांत पाटील शाई फेक : पत्रकार गोविंद वाकडेंची अखेर पोलिसांच्या ताब्यातून सुटका

मुंबई तक

• 04:42 AM • 12 Dec 2022

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी झालेल्या शाई फेक घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पत्रकार गोविंद वाकडे यांनाच ताब्यात घेतलं होतं. गोविंद वाकडे यांची पोलिसांकडून चौकशीही करण्यात आली. पत्रकारावरील पोलीस कारवाईवर पत्रकार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, पोलिसांनी रविवारी रात्री वाकडे यांना सोडून दिलं. चंद्रकांत पाटील […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी झालेल्या शाई फेक घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पत्रकार गोविंद वाकडे यांनाच ताब्यात घेतलं होतं. गोविंद वाकडे यांची पोलिसांकडून चौकशीही करण्यात आली. पत्रकारावरील पोलीस कारवाईवर पत्रकार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, पोलिसांनी रविवारी रात्री वाकडे यांना सोडून दिलं.

हे वाचलं का?

चंद्रकांत पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. “त्या काळात सरकार अनुदान देत नसतानाही डॉ. आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी लोकांकडे भीक मागून शाळा उभारल्या. आता मात्र संस्थाचालक शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्यानंतर तीव्र पडसाद उमटले.

चंद्रकांत पाटील यांच्या या विधानानंतर पिंपरी चिंचवडमध्ये शाई फेक करण्यात आल्याची घटना घडली. चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज घरबडे याने शनिवारी (10) शाई फेक केली होती. या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला होता. इतकंच नाही, तर व्हिडीओवरून पत्रकाराच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली होती.

चंद्रकांत पाटलांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक; शाईफेकीनंतर कार्यकर्त्यांनी केलं शुद्धीकरण

चंद्रकांत पाटलांनी पत्रकाराच्या भूमिकेवर उपस्थित केले होते प्रश्न

चंद्रकांत पाटील या घटनेनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते,’शाई फेकताना बरोबर अँगलने फोटो निघतो कसा? माझी मागणी आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे. हा कोण पत्रकार आहे? त्याला हा अँगल कसा मिळाला? तो त्याने कसा दिला? सायबरचे सगळे डिपार्टमेंट्स सक्रीय करा. हे चालणार नाही. तुम्ही पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर बाणा प्रमाणे काम करा. कुणासाठी तरी काम करु नका. उद्या सकाळपर्यंत हा पत्रकार शोधला गेला नाही, तर मी पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनसमोर उपोषणाला बसेल’, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला होता.

गोविंद वाकडेंना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काय घडलं?

चंद्रकांत पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी पत्रकार गोविंद वाकडे यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांना अटक होणार असल्याची माहितीही समोर आली होती. गोविंद वाकडे यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यांचा मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

चंद्रकांत पाटील शाई फेक प्रकरणात समोर आलं ‘बारामती’ कनेक्शन; 13 जणांवर गुन्हा

दरम्यान, गोविंद वाकडे यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर स्थानिक आणि राज्यातील पत्रकार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गोविंद वाकडे यांना सोडण्याची मागणी करत पत्रकार संघटनांनी उपोषणाचा इशारा दिला होता. रविवारी गोविंद वाकडे यांची चौकशी केली, त्यानंतर रात्री गोविंद वाकडे यांना सोडून देण्यात आलं. पत्रकार आणि पत्रकार संघटनांच्या इशाऱ्यानंतर गोविंद वाकडे यांना सोडून देण्यात आल्याची चर्चा आता सुरू आहे.

    follow whatsapp