सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांना कोर्टाने दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शरद गंभीरराव, तात्याराव माने आणि सदानंद थरवळ अशी या नगरसेवकांची नावं आहेत.
ADVERTISEMENT
कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे स्वर्गीय सावळाराम महाराज क्रीडा संकुलात अनधिकृत दुकानं तोडण्याची मोहीम राबवण्यात आली होती. या कामात शिवसेनेच्या तिन्ही नगरसेवकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता.
यावर सुनावणीदरम्यान कल्याणच्या सत्र न्यायालयाने माजी नगरसेवकांना दोन वर्ष सक्तमजुरी आणि ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. याचसोबत दंडाची रक्कम न भरल्यास आणखी सहा महिने तुरुंगवास होणार असल्याचं न्यायालयाने निकालात नमूद केलंय. ज्यामुळे स्थानिक शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
डोंबिवली पूर्वे कडील एमआयडीसी भागात स्वर्गीय सावळाराम महाराज क्रीडा संकुल आहे. पंधरा वर्षांपूर्वी या क्रीडा संकुलात अनधिकृत दुकानांचे गाळे उभारण्यात आले होते. हे दुकानांचे गाळे तोडण्याची कारवाई सुरू असताना या तिन्ही माजी नगरसेवकांनी त्या कामात अडथळा आणल्याचा आरोप होता. याबाबत तत्कालीन उपायुक्त रवींद्र वाघ यांनी डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याच प्रकरणाची कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी अंतिम सुनावणी झाली. यावेळी न्यायधीश एस. एस. गोरवाडे यांनी या माजी नगरसेवकांना दोषी ठरवत दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे.
याबाबत शिक्षा झालेल्या नगरसेवकांशी संपर्क साधला असता या जिल्हा सत्र न्यायायालयाच्या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सदानंद थरवळ आणि तात्यासाहेब माने यांनी सांगितले.
‘भाजप आम्हाला फार लांब नाही’; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला सूचक इशारा
ADVERTISEMENT