मिथिलेश गुप्ता, कल्याण: कल्याणमध्ये एका तरुणाच्या पोटात चॉपर भोसकून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी माजी भाजप नगरसेवक सचिन खेमा यांच्यासह 6 जणांच्या विरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
कल्याणच्या जोशीबाग परिसरात राहणारा भूषण जाधव या तरुणाला किरकोळ वादातून मारहाण झाली होती. ही मारहाण भाजपच्या माजी नगरसेवक सचिन खेमा यांनी केल्याने सचिन यांच्या विरोधात कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
भूषणने तक्रार केल्यानंतर सचिन खेमा यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले होते. या परिसरात राहणारा अमजद सय्यद या तरुणाच्या सांगण्यावरनच भूषणने तक्रार केली आहे असा संशय खेमा यांचा होता. त्यामुळे त्याच्यावर राग काढण्यासाठी काल रात्री अमजद सय्यद याच्या घरी काही लोक गेले. त्याला घरातून बाहेर आणून त्याला बेदाम मारहाण करत त्याच्या पोटात चाकूने हल्ला केला गेला.
हा सर्व प्रकार माजी नगर सेवक सचिन खेमाचे भाऊ नितीन खेमा आपले साथीदार प्रेम चौधरी, सतेज पोकळ उर्फ (बाळा), आणि बबलू माजिद शेख यांच्या सोबत मिळून सचिन खेमा यांच्या सांगण्यावरून केला असल्याचे पोलीस तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
याप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसानी भाजप माजी नगरसेवक सचिन खेमा त्याचा भाऊ नितीन खेमा, त्याच्यासोबत प्रेम चौधरी, सतेज पोकळ, बबलू शेख व अन्य एक तरुणाविरोधात हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर : मित्राच्या WhatsApp स्टेटसला बहिणीचा फोटो बघून सटकली; पोटात भोसकला चाकू
या संपूर्ण घटनेबाबत माजी नगरसेवक सचिन खेमा यांनी आपली बाजू मांडताना माझा कोणताही संबंध नसून मी पुण्याला होतो. केवळ राजकीय दबावापोटी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.
सध्या या गुन्ह्याचा तपास महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील हे करीत आहेत.
ADVERTISEMENT