कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेचे भाजपचे माजी स्थायी समिती सभापती व माजी नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात विनयभंग आणि जीवे मारण्याच्या धमकीच्या गुन्ह्यात अखेर अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
चेहऱ्यावर ऍसिड टाकण्याची धमकी व सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप करत एका पीडित तरुणीने केडीएमसीचे भाजपचे माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांच्या विरोधात कल्याणच्या बाजार पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, उच्च न्यायालयाने संदीप गायकर यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने काल रात्री संदीप गायकर कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात हजर झाला त्याला बाजरपेठ पोलिसांनी अटक केली.
संदीप दोन महिन्यांपासून फरार होता. संदीपचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. आज पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात संदीपला हजर करण्यात आलं. न्यायालयाने संदीपला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, संदीपच्या अटकेने राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे.
भाजप नगरसवेकाबाबत काय म्हणाले होते किरीट सोमय्या?
संदीप गायकर यांच्या विरोधात जेव्हा विनयभंगाची तक्रार करण्यात आली होती तेव्हा या प्रकरणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना विचारण्यात आलं होतं. ‘त्यावेळी त्यांनी एखाद्याने चूक केली असेल तर त्याच्या विरोधात कायद्याप्रमाणे योग्य ती चौकशी झाली पाहिजे’, असं सष्ट मत व्यक्त केलं होतं.
भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित महिलेला अश्लील मेसेज पाठवले, तसंच धमकी दिल्याचा आरोप करण्यात आले होते.
BJP च्या माजी नगरसेवकावर विनयभंगाचा आरोप
या प्रकरणी किरीट सोमय्या यांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आले होती. त्यावेळी कुणी काही चूक केली असेल तर त्याच्या विरोधात कायद्यानुसार चौकशी आणि कारवाई झाली पाहिजे, असं सोमय्या म्हणाले होते.
दरम्यान, याप्रकरणी आता भारतीय जनता पक्ष नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कारण येत्या काही महिन्यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी या मुद्द्यावरुन स्थानिक पातळीवर भाजपला लक्ष्य केलं जाऊ शकतं. त्यामुळेच भाजप आपल्या माजी नगरसेवकाविरोधात कारवाईचा कशाप्रकारे बडगा उगारणार याकडे विरोधकांचंही लक्ष आहे.
कोरोना संकटामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका या बऱ्याच लांबल्या आहेत. त्यामुळे आता या निवडणुका कधीही होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.
ADVERTISEMENT