अभिनेत्री कंगनाला हायकोर्टाने पासपोर्ट नुतनीकरण प्रकरणात कोणताही दिलासा दिलेला नाही. तातडीचा दिलासा देण्यास बॉम्बे हायकोर्टाने नकार दिला आहे. पासपोर्टची मुदत संपत असताना ऐनवेळी याचिका का दाखल केली? असा सवाल करून सिनेमाच्या चित्रीकरणाच्या तारखा बदलता येतात असंही हायकोर्टाने नमूद केलं आहे. कंगनाच्या याचिकेवर आता पुढची सुनावणी 25 जूनला होणार आहे. पासपोर्ट रिन्यू करण्याप्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली त्यावेळी कंगनावर देशद्रोह प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच मुद्दा उपस्थित करून पासपोर्ट प्राधिकरणाने कंगनाचा पासपोर्ट रिन्यू करण्यावर हरकत घेतली आहे. यामुळेच कंगनाने पासपोर्ट रिन्यू करून मिळावा म्हणून हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी आता तूर्तास तरी कंगनाला दिलासा मिळालेला नाही. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 25 जूनला होणार आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं होतं कंगनाने याचिकेत?
मला एका सिनेमात मध्यवर्ती भूमिका मिळाली आहे या सिनेमाच्या शुटिंगसाठी मला बुडापेस्ट हंगेरी या ठिकाणी जायचं आहे मात्र पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे पासपोर्टचं नुतनीकरण करण्यास नकार देत आहेत. ते नुतनीकरण मला करून मिळावं असंही कंगनाने म्हटलं. कंगनाच्या ‘धाकड’ सिनेमाच्या दुसऱ्या शेड्यूलचं शूटिंग बाकी आहे. यासाठी प्रवास करणं महत्वाचं असल्याचं या याचिकेत म्हंटलं आहे. तसंच कंगनाने आधीच शूटिंगसाठी कमिटमेंट केल्या आहेत. विदेशात प्रॉडक्शन हाऊसकडूनही सर्व तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे कंगनाचं तिथे पोहचणं महत्वाचं आहे असं म्हणतं पासपोर्ट रिन्यू करण्यात यावं अशी विनंती या याचिकेत करण्यात आली होती. मात्र या याचिकेबाबत कंगनाला कोणताही दिलासा तातडीने देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.
कोर्टाने काय म्हटलं आहे?
पासपोर्ट प्राधिकरणाने काही लेखी आक्षेप नोंदवला आहे का? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला. त्यावर पासपोर्ट नुतनीकरणासाठीचा अर्ज भरताना तेथील अधिकाऱ्यांनी तोंडी आक्षेप नोंदवला आहे असा दावा कंगनाच्या वतीने करण्यात आला. याशिवाय या याचिकेत पासपोर्ट प्राधिकरणाला प्रतिवादीही करण्यात आलेलं नाही. असं असताना आम्ही पासपोर्ट नुतनीकरणाचे अधिकार कसे देऊ शकतो? तुम्ही तुमची याचिका विस्तृत स्वरूपात दाखल करा. तुम्हाला नव्याने याचिका दाखल करण्याची मुभा आहे असंही कोर्टाने म्हटलं आहे. तसंच पासपोर्ट नुतनीकरणाचा निर्णय हा पोलीस स्टेशन किंवा पासपोर्ट प्राधिकरण घेतलं असंही हायकोर्टाने स्पष्ट केलं.
काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंगना आणि तिची बहिण रंगोलीवर वांद्रे पोलिस ठाण्यात मुनव्वर अली सैय्यद यांनी गुन्हा दाखल केला होता. मुनव्वर बॉलिवूडमध्ये कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर आहेत. कंगना आणि रंगोली यांच्या काही वादग्रस्त ट्विट्सचा हवाला देऊन मुनव्वर यांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली बॉलिवूडची प्रतिमा मलीन कऱण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हटलं होतं. तसंच कंगना आणि तिची बहीण रंगोली जाणीवपूर्वक दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहेत असाही आरोप केला होता. ज्यानंतर कंगना आणि रंगोलीवर धार्मिक तेढ निर्माण करणं, जाणीवपूर्वक धार्मिक भावनां दुखावणंया आरोपांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ADVERTISEMENT