तंत्रज्ञानाच्या गैरवापराच्या अनेक घटना दररोज ऐकायला वा वाचायला मिळातातच, पण हेच तंत्रज्ञान योग्य पद्धतीने वापरलं तर कसं मदतीचं ठरतं, याचा प्रत्यय कानपूरमधील एका व्यक्तीला आला. या व्यक्तीने घरात होणारी चोरी चक्क अमेरिकेतून रोखली.
ADVERTISEMENT
कानपूरमधील शामनगरमधील बंद असलेल्या एका घरात सोमवारी मध्यरात्री चोरटे शिरले. घरात चोरटे शिरल्याचं सध्या अमेरिकेत असलेल्या घरमालकाला कळलं. त्यांनी लगेच याची माहिती कानपूर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई केली. यावेळी झालेल्या गोळीबारात एक चोर गोळी लागून जखमी झाला.
नेमकं काय घडलं?
कानपूरचे रहिवासी असलेल्या विजय अवस्थी यांचं शामनगर येथे घर आहे. मात्र, सध्या विजय अवस्थी हे अमेरिकेत आहे. त्यामुळे त्यांचं घर बंद आहे. विजय अवस्थी यांनी घराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावलेले आहेत. या सीसीटीव्हीच्या माध्यमातून ते घरावर नजर ठेवतात. दरम्यान सोमवारी मध्यरात्री त्यांच्या घरात चोरटे घुसले.
कानपूरमध्ये मध्यरात्र असली, तरी अमेरिकेत मात्र त्यावेळी दिवस होता. त्यामुळे विजय अवस्थी हे मोबाईलवरून घरात होणाऱ्या हालचाली बघत होते. त्याचवेळी त्यांना घरात चोर घुसल्याचं दिसलं. त्यांनी लगेच कानपूर पोलिसांना फोन केला. माहिती मिळताच पोलीस शामनगर येथील घरी पोहोचले आणि घराला वेढा दिला.
पोलीस आल्याचं कळताच चोरट्यांनी पळून जाण्याचं प्रयत्न केला. पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पाण्याच्या टाकीजवळ एक चोर आणि पोलिसांची धुमश्चक्री झाली. यावेळी चोरट्यांने केलेल्या गोळीबाराला पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी एक गोळी चोरट्याच्या पायाला लागली. जखमी चोर हमीरपूर येथील असून, रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT