असंख्य गाण्यांना स्वरांचा साज चढवत अजरामर करणारे प्रसिद्ध गायक भूपिंदर सिंग यांचं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. सोमवारी (१८ जुलै) मुंबईत भूपिंदर सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध गायिका मिताली सिंग यांनी ही माहिती दिली.
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून भूपिंदर सिंग शारीरिक व्याधींनी त्रस्त होते. त्यांना अनेक व्याधी होत्या, अशी माहिती त्यांच्या पत्नी मिताली सिंग यांनी दिली. भूपिंदर सिंग यांच्या निधनाचं वृत्त धडकताच संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली. भूपिंदर सिंग यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधूनही शोक व्यक्त केला जात आहे.
भूपिंदर सिंग याची गाजलेली गाणी
भूपिंदर सिंग यांनी अनेक चित्रपटातील गाण्यांसाठी पार्श्वगायन केलं. मौसम, सत्ते पे सत्ता, आहिस्ता आहिस्ता, दुरियाँ आणि हकीकत यासह इतर असंख्य चित्रपटात त्यांनी गाणी गायली. ‘मेरा रंग दे बसंती चौला’, ‘प्यार हमे किस मोड पर ले आया’, ‘हुजूर इस कदर’, ‘एक अकेला इस शहर में’, ‘जिंदगी मिलके बिताएंगे’, ‘बीती ना बितायी रैना, ‘नाम गुम जाएगा’, ‘करोगे याद तो हर बात याद आयेगी’ ही त्यांनी गायलेली गाणी अजरामर झाली.
डिनर पार्टीत गात असताना मदन मोहन यांनी गाणं ऐकलं अन् भूपिंदर सिंग यांना मिळाला ब्रेक
भूपिंदर सिंग हे सुरुवातीच्या काळात दिल्लीतील ऑल इंडिया रेडिओसाठी गाणी म्हणायचे. संगीत साधनेबरोबरच त्यांनी गिटार आणि व्हायोलिन वाजवणंही शिकून घेतलं. १९६२ मध्ये संगीत दिग्दर्शक मदन मोहन यांनी ऑल इंडिया रेडिओचे प्रोड्युसर सतीश भाटिया यांच्याकडे डिनर पार्टीला गेले होते.
या पार्टीत मदन मोहन यांनी भूपिंदर सिंग यांचं गाण ऐकलं. त्यानंतर त्यांनी भूपिंदर सिंग यांना मुंबईला बोलावलं आणि मोहम्मद रफी, तलत मेहमूद आणि मन्ना डे यांच्यासोबत ‘होके मजबूर उसने मुझे बुलाया होगा’ या गाण्यात त्यांना संधी देण्यात आली. हकीकत सिनेमातील हे गाण चित्रपट रसिकांना प्रचंड आवडलं.
१९८० मध्ये भूपिंदर सिंग यांनी मिताली मुखर्जी यांच्यासोबत विवाह केला. मिताली सिंग या बांगलादेशी गायिका आहेत. भूपिंदर सिंग आणि मिताली सिंग यांनी असंख्य गझला गायल्या. त्याचबरोबर गाण्याचे लाईव्ह कार्यक्रमही ते करत. दोघांना एक मुलगा असून, त्याचं निहाल सिंग आहे. निहालही संगीत क्षेत्रातच काम करतो.
ADVERTISEMENT