ADVERTISEMENT
केंद्रीय विद्यालयातील प्रवेश प्रक्रियेत बदल केले जाणार असल्याची चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती. अखेर प्रवेश प्रक्रिया नियमावलीत बदल करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने केंद्रीय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील नवी मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे आता खासदारांसाठी राखीव असणारा कोटा रद्द करण्यात आला आहे.
एका आठवड्यांपूर्वी केंद्राने खासदारांच्या शिफारशीवरून केंद्रीय विद्यालयात दिल्या जाणाऱ्या प्रवेशांना स्थगिती दिली होती. आता प्रवेशासंदर्भातील सविस्तर माहिती केंद्रीय विद्यालयाच्या kvsangathan.nic.in या संकेतस्थळावर टाकण्यात आलेली आहे.
केंद्रीय विद्यालयाने जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक नियमावलीनुसार आता लष्कर, नौदल, हवाई दल आणि तटरक्षक दलाचे शिक्षा संचालक छावणी परिसरात बनलेल्या केंद्रीय विद्यालयात प्रत्येक ६ मुलांच्या नावांची शिफारस करू शकणार आहेत.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात कार्यरत असणाऱ्या लोकांच्या मुलांसाठी ६० जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या राखीव जागा अशा मुलांसाठी असतील, ज्याचे आई किंवा वडील परदेशात सेवेत असतील. त्याचबरोबर तो चालू वर्षात किंवा एका वर्षापूर्वी मायदेशी परतलेला असेल.
केंद्रीय पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, सीआयएसएफ, एनडीआरएफ आणि आसाम रायफल्स मधील बी वा सी गटात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी वर्षाला ५० जागा राखीव असतील.
केंद्रीय विद्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना वर्षभरात कधीही प्रवेश दिला जाणार आहे. पण, जर त्याला ९वी मध्ये प्रवेश हवा असेल, तर प्रवेश पूर्व परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे.
केंद्रीय विद्यालय संघटनाने दिलेल्या माहितीनुसार ज्या केंद्रीय कर्मचाऱ्याची सेवेत असतानाच मृत्यू झाला, तर त्यांच्या मुलांनाही केंद्रीय विद्यालयात थेट प्रवेश दिला जाणार आहे.
नव्या मार्गदर्शक नियमावलीनुसार, ज्या मुलांच्या आईवडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांनाही केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळणार आहे.
अशा अनाथ मुलांना जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीवर प्रवेश दिला जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही.
जिल्हाधिकारी वर्षभरात अशा १० विद्यार्थ्यांच्या नावाची शिफारस करू शकतील. त्याचबरोबर एकाच वर्गासाठी दोन विद्यार्थ्यांची शिफारस करू शकणार आहेत.
ADVERTISEMENT