अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत एक वादग्रस्त पोस्ट तिच्या फेसबुकवर पोस्ट केली. या फेसबुक पोस्टमध्ये तिने शरद पवारांवर केलेलं वक्तव्य हे अत्यंत घृणास्पद आहे. या सगळ्यावरून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. एवढंच नाही तर काही वेळापूर्वीच पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यातही घेतलं आहे. अशात आता अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केतकी चितळेचा निषेध नोंदवला आहे. केतकी चितळेने शरद पवारांची माफी मागितली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
शरद पवारांविषयी विकृत कविता पोस्ट करणारी केतकी चितळे आहे तरी कोण?
काय म्हणाल्या आहेत नवनीत राणा?
“केतकी चितळेने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टबाबत माफी मागितली पाहिजे.शरद पवार यांनी आपलं पन्नास वर्षाचा आयुष्य राजकीय कार्य काळातलं मोठ्या संघर्षाने निर्माण केले असून केतकीसारख्या लहान कलाकाराने असं वक्तव्य करणे चुकीचं आहे. केतकी चितळेने शरद पवार यांची माफी मागितली पाहिजे” असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केलेली पोस्ट अॅड नितीन भावे नावाच्या व्यक्तीची आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत भाषेत लिहिलेलं असून, त्यावरून केतकी चितळे आता टीकेची धनी ठरली आहे. त्याचबरोबर केतकी चितळे ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसंच तिला ताब्यातही घेण्यात आलं आहे.
वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेनं यावेळी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. आक्षेपार्ह भाषेत असलेल्या या पोस्टवरून आता केतकी चितळेवर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, त्याचप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सगळ्यांनी केतकी चितळेचा निषेध नोंदवला आहे.
केतकी चितळेने केलेली मूळ पोस्ट अॅड. नितीन भावे या व्यक्तीची असून केतकीने शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्यात केलेल्या भाषणात कवी जवाहर राठोड यांची एक कविता वाचून दाखवली होती. या कवितेतून कवीने देवी-देवतांवर टीकात्मक भाष्य केलेलं आहे. याच कवितेवरून सोशल मीडियावरून पवारांवर टीका केली जात होती. पवारांच्या भाषणाचा निवडक भाग शेअर करून ही टीका केली गेली. त्याच प्रकरणावरून केतकीने ही पोस्ट शेअर केली आहे.
केतकी चितळे अशा स्वरुपाच्या पोस्टमुळे वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ती अशाच पोस्टमुळे वादात अडकलेली आहे. १ मार्च २०२० रोजी चितळेने एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये ती म्हणाली होती, ‘नव बौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात. तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू हा शब्द उच्चारला तर घोर पापी, कट्टरवादी? पण, अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके व्यग्र आहोत. आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात. आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,’ असं केतकी म्हणाली होती.
ADVERTISEMENT