ठाणे महापालिका हद्दीत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला सहाय्यक आयुक्तांची बोटं छाटण्यात आल्याची क्रूर घटना घडली. या घटनेनंतर संतप्त प्रक्रिया व्यक्त होत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोटं छाटणाऱ्या फेरीवाल्याला अद्दल घडवू, असा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहीहंडी उत्सव, कोरोना आणि इतर मुद्द्यावर भूमिका मांडली. यावेळी त्यांना ठाण्यातील घटनेबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
राज ठाकरे म्हणाले, ‘ज्या दिवशी पोलिसांच्या ताब्यातून सुटेल, त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवता येईल. यांची सगळी बोटं ज्या दिवशी छाटली जातील आणि यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही ना, त्या दिवशी यांना कळेल. यांची हिंमत कशी होते? यांचा निषेध करून अन् आम्ही याचा जाहीर निषेध करतो, असं करुन हे लोक सुधरणार नाहीत’, अशा शब्दात राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
‘लोकांनी हे बघावं. आम्ही हे वारंवार सांगत होतो. याची हिंमत ठेचलीच पाहिजे. महाराष्ट्रातील अधिकाऱ्याची तुम्ही बोटं छाटता. आज पकडले… उद्या बेल होईल. परत दुसऱ्याची बोटं तोडायला बाहेर येतील. सरकार काय करतंय? सरकारने संबंधित यंत्रणांवर बंधनं आणली पाहिजे’, असं राज ठाकरे म्हणाले.
‘हे काय मुंबईत होतं का? पण अधिकाऱ्याची बोटं छाटण्याची कुणाची हिंमत झालेली नाही. इतक्या वर्षात मी कधी बघितलं नाही. बोटं छाटली. हे लोक जामीनावर सहीसलामत सुटणार. भीती काय असते हे त्यांना बाहेर आल्यानंतर कळेल’, असं म्हणत राज ठाकरे यांनी मनसे स्टाईल धडा शिकवण्याचा इशारा राज यांनी दिला.
आशिष शेलारांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र
भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही या घटनेवरून राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ‘ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करून एका फेरीवाल्याने तीन बोटं तोडल्याची अत्यंत चिड आणणारी घटना ठाण्यात घडली. राज्यात कायद्याचे राज्य आहे का? सरकार नावाची गोष्ट शिल्लक आहे का? महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे एवढे धिंडवडे कधीच उडाले नव्हते’, असं म्हणत शेलारांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
ADVERTISEMENT