कोल्हापूर : कोल्हापुरमध्ये डॉल्बी, बॅन्जो आणि इतर साऊंड सिस्टिम पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी नियमानुसार रात्री १२ नंतर बंद केली. त्यामुळे अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपून रात्र काढली. त्यानंतर आज सकाळी सहा वाजता डॉल्बीच्या दणक्यात पुन्हा एकदा मिरवणुकीला सुरुवात केली.
ADVERTISEMENT
कोल्हापुरमध्ये पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये रात्री बारानंतर साऊंड सिस्टिम बंद करण्यात येईल, असा इशारा सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना दिला होता. त्यानुसार रात्री बारानंतर पोलिस प्रशासनाने नियमानुसार मिरवणुका जिथे असतील तिथे साऊंड सिस्टिम बंद करण्यास सुरुवात केली. यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काही वेळ केवळ विद्युत प्रकाश झोतात मिरवणुकीला सुरुवात केली.
मात्र काही वेळानंतर अनेक मंडळांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक थांबवून रस्त्यावरच मुक्काम करण्यास सुरुवात केली. महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ या गणेश विसर्जन मार्गांवर हेच चित्र पाहायला मिळाले. रात्रभर मुक्काम केल्यानंतर आज सकाळी डॉल्बी आणि बॅन्जोच्या आवाजात गणेश विसर्जन मिरवणूक पुन्हा सुरू झाली आहे. कोल्हापुरमध्ये सर्व गणेश मूर्ती या इराणी खण इथे विसर्जित केल्या जातात.
शहरात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. सायंकाळी साडेसहापर्यंत गतीने व नियोजनाबद्ध पद्धतीने ही मिरवणूक सुरू होती. मात्र मुख्य महाद्वार रोड विसर्जन मार्गावर आल्यानंतर अनेक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी साऊंड सिस्टिम स्ट्रक्चरचा वापर करत विसर्जन मिरवणूक संथ गतीने सुरू केली. त्यामुळे रात्री बारानंतरही मिरवणूक लांबली. परिणामी पोलिसांना साऊंड सिस्टिमवर कारवाई करावी लागली, असे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT