बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणात न्यायालयाने पाच वर्षाच्या तुरूंगावासाची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर दंडाही ठोठावण्यात आला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर लालू प्रसाद यादव यांनी ट्वीट केलं आहे. तर त्यांचे पूत्र आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही निकालाबद्दल भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
डोरंडा कोषागाराशी संबंधित १३९.३५ कोटी रुपयांच्या चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरवत विशेष सीबीआय न्यायालयाने आज लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली. लालू प्रसाद यादव यांना ५ वर्ष तुरूंगवास तसेच ६० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
लालूप्रसाद यादवांना आणखी 5 वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड देखील; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी (२१ फेब्रुवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लालू प्रसाद यादव यांच्यासह या प्रकरणात दोषी आढळलेल्या ३८ जणांनाही शिक्षा सुनावली असून, सीबीआय न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं लालू प्रसाद यादव यांच्या वकिलांनी निकाल आल्यानंतर सांगितलं.
दरम्यान, चारा घोटाळा प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी ट्वीट करत विरोधकांना निशाणा साधला आहे. “अन्याय, विषमता, हुकुमशाही जुलमी सत्तेविरुद्ध नजरेला नजर भिडवून लढलो, लढत राहिन. सत्य हीच ज्याची शक्ती आहे आणि जनताही त्याच्यासोबत आहे. तुरुंगातील सळया त्याचा दृढनिश्चय कसा तोडतील”, असं लालूंनी म्हटलं आहे.
लालू प्रसाद यादव यांच्याबरोबरच विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही निकालानंतर मत मांडलं. “हा काही अंतिम निकाल नाही. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय आहे. उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचाही पर्याय आहे.”
“अनेक वेळा कनिष्ठ न्यायालयाने दिलेले निकाल बदलले जातात. असं वाटतंय की देशात फक्त एकच घोटाळा झाला आहे. तुरुंगात फक्त गरीबांचा नेताच गेला आहे. बिहारमध्ये आतापर्यंत ८० घोटाळे झाले आहेत, पण आतापर्यंत कुठल्या प्रकरणात कुणी नेता तुरुंगात गेलाय का? देशातील गरीब जनता बघतेय. विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी कुठे आहेत, त्या लोकांवर काय कारवाई झाली. जनतेचं न्यायालय सर्वोच्च असतं आणि जनतेच्या नजरेत राजदचे सर्वेसर्वो निर्दोष आहेत”, असं तेजस्वी यादव म्हणाले.
ADVERTISEMENT