अयोध्येतला जमीन खरेदी व्यवहार ही CBI-ED साठी फिट केस – देशमुखांवरील कारवाईनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई तक

• 06:30 AM • 25 Jun 2021

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील घरांवर आज ईडीने छापेमारी केली आहे. गृहमंत्री पदावर असताना अनिल देशमुख यांनी सचिन वाझेकडे १०० कोटी मागितल्याचा आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. दरम्यान या छापेमारीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपासयंत्रणा […]

Mumbaitak
follow google news

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील घरांवर आज ईडीने छापेमारी केली आहे. गृहमंत्री पदावर असताना अनिल देशमुख यांनी सचिन वाझेकडे १०० कोटी मागितल्याचा आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. दरम्यान या छापेमारीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.

हे वाचलं का?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपासयंत्रणा विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप केलाय. “जमिनीचे व्यवहारच जर काढायचे असतील तर सीबीआय आणि ईडीसाठी अयोध्येमधील जमीन खरेदी व्यवहार ही अत्यंत फिट केस आहे. तपास यंत्रणांनी तिकडे जाऊनही तपास करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र भाजपनेच नव्हे तर केंद्रातील भाजपच्या कार्यकारणीनेही याबद्दल ठराव करायला हवा. ईडी आणि सीबीआयने या जमीन घोटाळ्याचा तपास करावा”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही देशमुखांच्या घरावर करण्यात आलेल्या छापेमारीविरुद्ध आपली प्रतिक्रीया दिली आहे. “आतापर्यंत या देशात आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा एवढा वापर झालेला मी पाहिला नाही. भाजपची सत्ता आल्यापासून पवार साहेबांनाही ईडीची नोटीस आली होती त्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला आहे. महाराष्ट्रात असं राजकारण कधीच केलं जात नाही. राज्यात सत्तेचा गैरवापर हा विरोधकांना त्रास देण्यासाठी कधीच केला जात नसल्याचं”, सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

महाविकास आघाडी राज्यात विकासाचं राजकारण करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन हे प्रकार जाणुन बुजून केले जात आहेत असं दिसतंय. आम्ही कधीही वैयक्तित राजकारण केलं नाही आणि करणार नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी ईडीच्या कारवाईविरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली.

    follow whatsapp