मुंबई: ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांच्यावर काल (6 फेब्रुवारी) मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी लता दीदींच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला.
ADVERTISEMENT
लता दीदी यांचे सगळ्यात धाकटे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या बहिणीला अखेरचा निरोप दिला. त्यावेळी हृदयनाथ मंगेशकरांच्या चेहऱ्यावर प्रचंड दु:ख दिसत होतं. लता दीदी या हृदयनाथ मंगेशकरांपेक्षा8 वर्षांनी मोठ्या होत्या. तसंच आशा भोसले यांच्यापेक्षाही ते 4 वर्षांनी लहान आहेत.
हृदयनाथ यांनीही आपल्या मोठ्या बहिणी लता आणि आशा यांच्या पावलावर पाऊल ठेवून संगीत क्षेत्रात करिअर केलं. संगीत आणि चित्रपटसृष्टीत त्यांना ‘बाळासाहेब’ म्हणून ओळखलं जातं. हृदयनाथ हे व्यवसायाने संगीत दिग्दर्शक आहेत. लता आणि आशा यांच्याशिवाय त्यांना आणखी दोन मोठ्या बहिणी आहेत, ज्यांची नावे उषा मंगेशकर आणि मीना खडीकर अशी आहेत.
हृदयनाथ यांनी 1955 साली मराठी चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये तसे तुलनेनं कमीच काम केलं, पण ते मराठी चित्रपटसृष्टीतच अधिक रमले आणि त्यातच ते सक्रियही राहिले.
हृदयनाथ यांच्या संगीतातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले आहे. 2009 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय 1990 मध्ये ‘लेकिन’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. त्यांनी लताजींना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.
लता मंगेशकर यांचे निधन ही चित्रपटसृष्टीसाठी दु:खद घटनाच आहे. लतादीदींनी आपले संपूर्ण आयुष्य संगीतासाठी वाहून घेतले होते. 7 दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत त्यांनी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही असे स्थान मिळवले होते.
लता मंगेशकर यांच्या बहीण आशा भोसले या देखील दीदींच्या अंत्ययात्रेत हजर होत्या. त्यावेळी त्या देखील खूप उदास आणि नि:शब्द दिसून आल्या. बहिणीच्या मृतदेहाशेजारी बसलेल्या आशाचा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरलही झाला आहे.
ADVERTISEMENT