सध्या काहीही प्रश्न पडला तर ते समजून घेण्यासाठी आपण युट्युबची मदत घेतोत. पण मध्यप्रदेशच्या एका टोळीनं युट्युबवरून अजब शक्कल लढवली. त्यांनी चक्क एटीएम मशीनमधून पैसे कसे चोरायचे याचं ज्ञान युट्युबवरून घेतलं आणि नागपूर जिल्ह्यातील तब्बल 33 एटीएममधून चोरी केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या अंतरराज्यीय टोळीला जेरबंद केलं आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना या तिघांनी आपण युट्युबवर शिकून शहरातील 33 एमटीएम मशीनमधून लाखो रुपये चोरल्याचं कबूल केलं आहे.
ADVERTISEMENT
काय आहे संपूर्ण प्रकरण?
राज्यात सध्या एटीएम फोडून चोरीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. एटीएम मशीन फोडून पैसे चोरणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अशीच मध्यप्रदेशमधील एका टोळीनं नागपूर जिल्ह्यासह इतर ठिकाणी धुमाकूळ घातला होता. तेथील राहुल सरोज (24), खंडवा, प्रतापगढ़ संजयकुमार पाल (23) आणि अशोक पाल (26), या तिघांनी फक्त 10 पर्यंत शिक्षण घेतलं आहे. असं असताना त्यांनी युट्युबच्या माध्यमानं एटीएम मशीनमधून पैसे कसे चोरी करायचे, ही कला शिकून घेतली.
असा लागला तपास
या तिघांनी एकदा अशीच 15 ऑगस्ट रोजी नागपूर शहरातील सीए रोडवरील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममधून पैसे चोरले होते. याप्रकरणी बँकेचे मॅनेजर राजू डोंगरे यांनी पोलीसात तक्रार दिली होती. याप्रकरणाचा तपास पोलिसांनी जलदगतीने फिरवला. मिळालेलं सीसीटीव्हीचं फुटेज, खबऱ्यामार्फत मिळालेली माहिती या आधाराने तपास सुरु ठेवला. अखेर 18 सप्टेंबर रोजी पोलिसांना या आरोपीना पकडण्यात यश आले. पोलिसांनी राहुल, संजयकुमार आणि अशोकच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 3 मोबाईल, 8 हजार 240 रुपये नकद, पाने, स्क्रूड्रायव्हर असं मुद्देमाल जप्त केला. विनोद सरोज आणि मोनू सरोज या दोन फरार आरोपींचा पोलीस तपास करीत आहेत.
गुन्ह्याची दिली कबुली
आरोपींनी पोलिसांच्या ताब्यात असताना आपण युट्युबच्या माध्यमाने एटीएम मशीन चोरी शिकलो असल्याचं कबूल केलं. तसंच नागपूर जिल्ह्यातील एकूण 30 पेक्षा जास्त मशिनमधून चोरीची कबुली त्यांनी दिलीय. यासह त्यांनी गुजरातच्या अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, पुणे, ठाणे, मध्यप्रदेश राज्यातील कटनी येथील एटीएममधून चोरी केल्याचं सांगितलं. तिघांना न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना सुरुवातीला 10 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर या आरोपींची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
अशी करायचे चोरी
आरोपी एक पातळ पट्टी मशीनच्या कॅश निघणाऱ्या जागेत घालून ठेवायचे. ज्यामुळे कॅशचा ट्रे वर येत नव्हता. जेंव्हा कोणी एटीएम स्वाईप करत असे तर पैसे त्याच्या खात्यातून निघत असे, पण मशीनच्या बाहेर येत नसे. त्यामुळे व्यक्ती तिथून निघून गेल्यावर तिथेच घुटमळत असलेले हे आरोपी पट्टी वर सरकवून कॅश घेऊन गायब व्हायचे.
ADVERTISEMENT