हर्षदा परब: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ‘वर्क फ्रॉम होम’वर अधिक भर देण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका मुंबईच्या डबेवाल्यांना बसला आहे. कार्यालय, शाळा, कारखाने, बँका इथे डबे पोहोचविण्याऱ्या डबेवाल्यांचं काम गेले वर्षभर 5 ते 10 टक्के प्रमाणात काम सुरू आहे. काम कमी झाल्याने आणि उदरनिर्वाह करायचा असल्याने मग डबेवाल्यांवर आता हमाली, रोजगार हमी योजनेची काम, मजुरी, किंवा लाकूड तोडण्याची कामं करण्याची वेळ आली आहे.
ADVERTISEMENT
नालासोपारामध्ये राहणारे बाळू लोते आणि त्यांच्याबरोबरच इतर पाच सहा डबेवाले ग्रॅण्ट रोडमधील लॅमिंग्टन रोडला असलेल्या गल्लीत एका ठिकाणी उभे राहतात. दररोज सकाळी 11 ते 11.30 च्या सुमारास तिथे येऊन उभे राहणाऱ्या डबेवाल्यांना मग तिथल्या दुकानांमध्ये माल घेऊन येणारे ट्रक, टेम्पो, ट्रॅव्हल्सच्या गाड्यांमधून सामान, पार्सल उतरविण्याचं काम मिळतं.
“नाका कामगारांप्रमाणे काम करण्याची वेळ आलीय आमच्यावर. मिळालं तर काम आणि दिवसाचं उत्पन्न मिळतं” बाळू लोते सांगतात. बाळू लोते यांच्या कुटूंबात तीन मुलं ते आणि पत्नी राहतात. गेल्या वर्षी त्यांनी शेतीवर कर्ज काढून कसंबसं घरं चालवलं. मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढलं. पण घर चालविण्यासाठी त्यांना हमाली करायला लागतेय. बाळू सांगतात कोणीच मदत केली नाही. सुरुवातीला बाळू यांनी ज्यांचे डबे ते पोहोचवत होते त्या प्रत्येक व्यक्तीला संपर्क केला. त्यांच्याकडे काम मागितलं. पण कोणीच काम दिलं नाही तेव्हा त्यांनी हमालीचा निर्णय घेतला.
पूर्वी मजले मजले चढून डबे पोहोचवायचो आता पार्सल, कार्टून नेऊन खांद्यावर मारुन सोडतो. जसे मजले वाढतील आणि वजन असेल तसे पैसे मिळतात. एक बॉक्स दुसर-या मजल्यावर वाहून नेण्यासाठी बॉक्समागे सुमारे 20 रुपये मिळतात. “ दिवसाला 100 ते 200 रुपयांचं उत्पन्न होतं. काम मिळालं तर हे उत्पन्न नाही रीकाम्या हाती घरी जावं लागतं. सरकारने ट्रान्सपोर्टला यावेळेस बंधनातून वगळल्याने हे उत्पन्न आहे. सरकारने या ट्रान्सपोर्टवर बंदी आणू नये नाहीतर आमच्यासारखा गरीब माणूस मरुन जाईल,” बाळू हताश होऊन सांगतात.
त्याचवेळी तिथे असलेले चंदू आंद्रे सांगतात की आता रुग्णालयांमधले कर्मचारी, डॉक्टर आणि क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींचे डबे पोहोचवण्याचंच काम उरलंय. दिवसाला सात ते आठ डबेच उरलेत. कोरोना येण्याआधी सुमारे 50 डबे दिवसाला पोहोचवायचे. तर मदन तुपे जे तिथून जवळच असलेल्या डायमंड मार्केटमध्ये ते डबे घेऊन जायचे. कालपासून तिथले सर्व डबे बंद झाल्याचं त्यांनी सांगितलं.
ग्रॅण्टरोडमध्ये माथाडी कामगारांचे मुकादम असलेले कुंडलिक शिंदे यांनी या डबेवाल्यांना त्यांच्या इतर कामगारांबरोबर काम करण्याची परवानगी दिली. “गेल्या वर्षी आमच्याकडे पण काम नव्हतं. सरकारने ट्रान्सपोर्ट सुविधा सुरू ठेवल्यामुळे यावेळी काम आहे. आम्ही यांना इथे काम करू देतो कारण हे लोक आमचे नातेवाईक आहेत आणि आम्हाला त्यांचे हाल पाहवत नाहीत,” शिंदे सांगतात.
मुंबईमध्ये सुमारे 5 ते 6 हजार डबेवाले दररोज दोन लाख डबे पोहोचवायचे. आता ते काम सुमारे 5 ते 6 टक्क्यांवर आल्याची माहिती डबेवाले वाहतूक संघटनेचे प्रवक्ते विष्णू काळढोके यांनी दिली. “जे डबेवाले मुंबईत भाड्याने राहत होते. त्यांना परवडत नाही म्हणून ते गावी गेले. मिळेल ते काम करण्याची पाळी डबेवाल्यांवर आली आहे.
काही डबेवाल्यांना नाईलाजाने हमाली करावी लागतेय. काही संस्थांनी मागच्या वेळेस रेशन देऊन मदत केली होती.” सरकारकडे ऑक्टोबर 2020 मध्ये डबेवाल्यांनी असंघटीत कामगरांचा दर्जा देण्याची मागणी केली. होती ज्याने असंघटीत कामगार म्हणून डबेवाल्यांना महिन्याला सुमारे 5000 रुपये मिळाले असते. पण सरकारने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. मुंबईतले डबेवाले आता सरकारने पुन्हा लॉकडाऊन लावू नये अशी मागणी सरकारकडे करत आहेत.
ADVERTISEMENT