दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटने बघता बघता भारतातही शिरकाव केला आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले दोन रुग्ण कर्नाटकात आढळून आले. त्यामुळे यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. केंद्र सरकारबरोबर सर्वच राज्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना दिसत असून महाराष्ट्रातही काही प्रमाणात निर्बंध वाढवण्यात आले आहेत. त्यातच आता लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली असून, त्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
ADVERTISEMENT
दक्षिण आफ्रिकेसह जोखमीच्या (हाय रिस्क) देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. अशा रुग्णांच्या कोविड चाचण्या केल्या जात असून, आतापर्यंत परदेशातून राज्यात आलेल्या प्रवाशांपैकी 30 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारकडून निर्बंध वाढण्याच्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
लॉकडाऊनबद्दल सध्या सुरू असलेल्या चर्चेवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत सरकार संवेदनशील आहे. कोविड टास्क फोर्सच्या (Maharashtra Covid Task Force) तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) दोन दिवसात नवीन नियमावलीसंदर्भात निर्णय घेतील’, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
नागरिकांना केलं आवाहन…
‘ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटसंदर्भात येणाऱ्या बातम्यांमुळे नागरिकांनी भयभीत होवू नये. कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधांचे नियम पाळावेत आणि लसीकरण करून सुरक्षिततेची खात्री करून घ्यावी’, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं आहे.
दादरा आणि नगर हवेली नाईट कर्फ्यू
ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर दादरा आणि नगर हवेलीत प्रशासनाने नाईट कर्फ्यू लागू केला आहे. डिसेंबर अखेरीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू असणार आहे.
कोरोना होऊन गेलेल्यांनाही पुन्हा संसर्गाचा धोका
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्गाचा वेग आधीच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही जास्त असल्याचं सुरुवातीच्या माहितीवरून समोर आलं होतं. मात्र, या व्हेरिएंटबद्दल आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोना होऊन गेलेल्यांनाही या व्हेरिएंटचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचं दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट इम्युनिटी सिस्टीमला चुकवून शरीरात प्रवेश करत असल्याच्या संदर्भात हा अभ्यास करण्यात आला. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT