राज्यातील ठराविक जिल्ह्यांमध्ये केलेली अनलॉकची घोषणा आणि त्यानंतर घ्यावा लागलेला यू-टर्न यावरुन महाविकास आघाडी सरकारला टीकेचं धनी व्हावं लागतंय. विरोधी पक्षाने या गोंधळावरुन सरकारला धारेवर धरलंय, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी कोरोनाचे नियम म्हणजे राज्य सरकारला खो-खो चा खेळ वाटला का? असा संतप्त सवाल विचारला आहे.
ADVERTISEMENT
लॉकडाउनच्या सारख्या निर्णयामध्ये एवढा गोंधळ कसा होतो असं विचारत सरकारच्या बालिशपणामुळे संपूर्ण महाराष्ट्राची जनता होरपळतेय असंही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
दरम्यान, या सगळ्या गोंधळानंतर विरोधी पक्षाने देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यामुळे हा नेमका निर्णय काय होता आणि बैठकीत नेमकं काय ठरलं याविषयी ‘मुंबई तक’ने (Mumbai Tak) थेट विजय वडेट्टीवार यांची Exclusive मुलाखत घेतली. पाहा यावेळी वडेट्टीवार हे नेमकं काय-काय म्हणाले.
प्रश्न: महाराष्ट्रात अनलॉकिंग सुरु झालं आहे का, अनलॉक होणार का?
विजय वडेट्टीवार: महाराष्ट्र अनलॉक होण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्रात जो लॉकडाऊन आता लागू आहे तो टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा विषय होता. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत असं ठरलं की, यात पाच लेव्हल करायचे. यामध्ये पहिल्या लेव्हलला आपण काय शिथिलता द्यायची, दुसऱ्या लेव्हलला काय शिथिलता द्यायची आणि पाच लेव्हलचा निकष हा होता की, पॉझिटिव्हिटी रेट, ऑक्सिजन बेड किती भरलेले आहेत हा होता. यावर हा निर्णय घेण्याचं ठरलं होतं. यावर चर्चा देखील झाली.
चर्चा झाल्यानंतर याला तत्वत: मान्यता देखील दिली. परंतु मी बोलल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक झाला असा चित्र निर्माण झालं. खरं म्हणजे अनलॉक लावणं हा काही सरकारचा विषय नाही. लोकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेऊन कोरोना आपल्याला दूर कसा ठेवता येईल हे पाहणं गरजेचं आहे. हे सगळं जनतेच्या सहकार्यावर अवलंबून आहे. पण मुळात विषय असा आला की, एकदम बातमी अशी आली की, महाराष्ट्र पूर्ण अनलॉक झाला. पण महाराष्ट्र पूर्ण अनलॉक झालेला नाही. पण काही जिल्ह्यात रोजगाराच्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे आणि तिथे पॉझिटिव्हिटी रेट कमी आला. तर मात्र, त्या-त्या जिल्ह्यातील लॉकडाऊन कमी करायचा हा तत्वत: निर्णय मान्य झालेला आहे. हा निर्णय कधी लागू करायचा याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील.
प्रश्न: तुम्ही 18 जिल्ह्याची पहिल्या लेव्हलमध्ये घोषणा केल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला का?
विजय वडेट्टीवार: नाही संभ्रम निर्माण झाला नाही. ठाणे जिल्हा हा लेव्हल एक मध्ये घेण्यात आला कारण की, तेथील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडस किती भरलेले आहेत त्यावर. आजच्या दिवशी जो जिल्ह्यांचा डेटा समोर आला त्यानुसार त्या-त्या जिल्ह्याची लेव्हल ठरली. लेव्हलमध्ये संभ्रम नाही. ही लेव्हल काय मी तयार केलेली नाही. ती संबंधित विभागाने तयार केलेली यादी आहे. याला तत्वत: मान्यता देखील मिळाली. पण याला तत्वत: मान्यता मिळाली हे सागंण्याऐवजी आपण टप्प्याटप्प्याने काय सुरु करणार आहोत हे सांगितलं. यामध्ये मीडियाने पूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल असं चित्र निर्माण केलं. खरं तर या यादीनुसार 43 विभाग करण्यात आले आहेत. या 43 विभागानुसार आपण 18 विभाग हे लेव्हलमध्ये ठेवले आहेत. यानुसार इतर लेव्हलप्रमाणे विभागाची नोंद केली गेली.
ADVERTISEMENT