मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: डोंबिवली पूर्वेकडील हायप्रोफाईल वस्ती असलेल्या कासारिओ गोल्ड संकुलातील प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर तरुणाने देखील आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मृतक प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. अनिल मधुकर साळुंखे (वय 33 वर्ष) असे मृत आरोपीचे नाव आहे. तर ललिता सुरेश काळे (वय 28 वर्ष) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.
ADVERTISEMENT
प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरल्याच्या वादातून तिची हत्या करून प्रियकराने आत्महत्या केल्याची ही घटना डोंबिवलीसारख्या शहरात घडली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील हायप्रोफाईल वस्ती असलेल्या कासारिओ गोल्ड संकूलमधील एका इमारतीमध्ये घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मृतक प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
मृतक अनिल हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील चांदवडमधील वडनेर गावाचा रहिवाशी होता. तर हत्या झालेली ललिता ही डोंबिवली पूर्वेतील कासारिओ गोल्ड संकूलमध्येच राहत होती. या दोघांमध्ये प्रेमसंबध होते. पण असं असतानाही ललिताने दुसऱ्या तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. एवढंच नव्हे तर दुसऱ्या तरुणासोबत तिचा कुंकवाचा कार्यक्रम देखील आटोपला होता.
याच गोष्टीचा राग मनात धरून अनिल याने ललिताला कायमचं संपवण्याचा कट रचला. यासाठी त्याने ललिताला शेवटचं भेटावं असा बहाणा केला. ललिताने देखील या शेवटच्या भेटीला परवानगी दिली. त्यामुळे अनिल 29 मे रोजी तिच्या राहत्या घरी सायंकाळच्या सुमारास आला.
त्यानंतर तो तिच्या बेडरूममध्ये गेला आणि दोघेही तिथेच झोपले. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अनिलने बेडरूमचा दरवाजा कडी लावून बंद करुन घेतला. त्यानंतर अनिलने सोबत आणलेल्या नायलॉन दोरीने झोपेत असलेल्या ललिताची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर अनिलने स्वतः त्याच नायलॉनच्या दोरीने फास घेऊन बेडरुममध्येच आत्महत्या केली.
दरम्यान, दुसऱ्याच दिवशी बराच वेळ झाला तरीही बेडरूमचं दार उघडलं नसल्याचं ललिताच्या बहिणीला दिसलं. त्यामुळे तिने तात्काळ याबाबतची माहिती घरच्यांना दिली. त्यानंतरच हत्या आणि आत्महत्येचा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आला.
मुंबई : प्रेयसी गावी जाऊन नये म्हणून त्याने घेतला ७ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव
या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर त्यांनी पंचनामा करत दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवले.
याप्रकरणी मृतक ललिताची बहीण अनिता हिच्या तक्रारीवरून मृतक प्रियकर अनिल याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. लांडे करीत आहेत.
ADVERTISEMENT