बजेट सादर होण्यापूर्वीच एलपीजी सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. इंधन कंपन्यांनी मंगळवारी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस अर्थात LPG सिलिंडरची किंमत जाहीर केली. व्यावसायिक कारणासाठी वापरण्यात येणारा सिलिंडर 91.5 रूपयांनी स्वस्त झाला आहे. तर घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
ADVERTISEMENT
फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर 899.50 रूपये आहे. तर मुंबईत एलपीजी गॅस सिलिंडरचे दर 915.50 रूपये इतकी आहे. पाच राज्यांच्या निवडणुका समोर असल्याने सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ होणार नाही असा अंदाज वर्तवला जात होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे आणि गॅसच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, इंधन कंपन्यांनी कोणतीही दरवाढ केली नाही. याआधी 6 ऑक्टोबर रोजी गॅसची दरवाढ करण्यात आली होती.
आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री आर्थिक वर्ष 2022-2023 साठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. कोरोनामुळे प्रभावित झालेली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अर्थमंत्र्यांसमोर ठोस पावलं उचलण्याचं आव्हान असणार आहे. मागणी-पुरवठ्यातील तफावत आणि पुरवठ्यातील व्यत्यय यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती या 90 डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास आहेत. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारी तेल कंपन्या, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत नसल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत. भविष्यात पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्यास त्याचा थेट परिणाम महागाईवर होणार असल्याची शक्यता निर्माण होत आहे.
1 फेब्रुवारी रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. सध्या देशातील पेट्रोल-डिझेलचे दर ऐतिहासिक पातळीवर आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असूनही देशातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार आहेत.
ADVERTISEMENT