घातपाती हल्ल्याच्या तयारीत असलेल्या सहा सशंयित दहशतवाद्यांना अटक करत दिल्ली पोलिसांनी मोठा कट उधळून लावला आहे. सहा संशयित आरोपींपैकी एक जण मुंबईतील असून, त्याच्यासंबंधी महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी माहिती दिली.
ADVERTISEMENT
धारावीचा रहिवासी असलेला जन मोहम्मद शेख उर्फ समीर कालीयाचे २० वर्षांपूर्वी दाऊदच्या गँगशी संबंध होते. तो मुंबईहून दिल्ली जात असतानाच त्याला अटक करण्यात आली, असं एटीएसप्रमुख अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
अग्रवाल म्हणाले, ‘दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली असल्याचं दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे. त्यातील एक व्यक्ती मुंबईतील धारावीचा रहिवासी आहे. त्याचं नाव जन मोहम्मद अली मोहम्मद शेख. तो धारावीत राहायचा आणि त्याची बरीच हिस्ट्री आहे. पाकिस्तानातील दाऊद गँगसोबत संबंध असल्याचं २० वर्षांपूर्वीची माहिती आहे. आमची नजरही या व्यक्तीवर होती’, असं एटीएसप्रमुखांनी सांगितलं.
‘त्याच्यावर नजर होती मात्र, ज्या प्रकरण घडलं आहे. त्याची माहिती आमच्याकडे नव्हती. ही केंद्रीय गुप्तचर यंत्रणांची माहिती होती. जी दिल्ली पोलिसांना दिली गेली. या व्यक्तीशी सांगायचं म्हटलं, तर त्याने ९ सप्टेंबरला दिल्लीला जाण्याचा प्लान केला होता. दहा तारखेला पैसेही ट्रान्स्फर केले होते. पण त्याचं तिकीट कन्फर्म होत नव्हतं. त्याने १३ तारखेला प्रतीक्षा यादीतून तिकीट काढलं. गोल्डन एक्स्प्रेसचं त्याने तिकीट काढलं होतं’, असं त्यांनी सांगितलं.
‘संध्याकाळपर्यंत त्याचं तिकीट कन्फर्म झालं. त्यानंतर तो एकटाच निझामुद्दीनच्या दिशेने रवाना झाला. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून तो बसला होता. एक्स्प्रेस जेव्हा राजस्थानातील कोटामध्ये पोहोचली. तिथेच त्याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळ कोणताही शस्त्रसाठा वा शस्त्र आढळून आली नाहीत. याबद्दलची सगळी माहिती दिल्ली पोलिसांकडे आहे. आमचं एक पथक दिल्लीला जाणार आहे. तिथे जान मोहम्मदची चौकशी केली जाईल. दिल्ली पोलिसांकडे असलेली माहिती हे पथक घेऊन येईल’, अशी माहिती त्यांनी दिली.
‘सध्या त्याची आर्थिक परिस्थिती बरी नव्हती. झोपडपट्टीमध्ये तो राहायचा. कशाबद्दलचा कट आहे, याचा तपास सुरू आहे. याप्रकरणात गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून पूर्णपणे अधिकार देण्यात आलेले आहेत. सध्या अंडर वर्ल्ड टेरर सध्या शून्य आहे. त्यामुळे आताच यावेळी काही सांगता येणार नाही’, असंही ते म्हणाले.
ADVERTISEMENT