मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना दक्षिण मुंबईतील एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. २३ मार्च रोजी रश्मी ठाकरे यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. ज्यानंतर रश्मी ठाकरेंनी स्वतःला घरात क्वारंटाइन केलं होतं. यानंतर रश्मी ठाकरेंना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या तब्येतीविषयीची नेमकी माहिती अद्याप समजू शकलेली नाही. रश्मी ठाकरे यांच्याआधी आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
ADVERTISEMENT
दरम्यान, महाराष्ट्रात दिवसभरात २७ हजार ९१८ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात २५ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. आजचा दिवसही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्रात दिवसभरात २३ हजार ८२० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात दिवसभरात २३ हजार ८२० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत २३ लाख ७७ हजार १२७ कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८५.७१ टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज १३९ कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा १.९६ टक्के आहे.
आजवर तपासण्यात आलेल्या १ कोटी ९६ लाख २५ हजार ६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७ लाख ७३ हजार ४३६ नमुने पॉझिटिव्ह झाले आले आहेत. सध्या राज्यात १६ लाख ५६ हजार ६९७ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर १७ हजार ६४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला ३ लाख ४० हजार ५४२ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. राज्यात दिवसभरात २७ हजार ९१८ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या ही २७ लाख ७३ हजार ४३६ इतकी झाली आहे.
महाराष्ट्रात दिवसभरात नोंद झालेल्या १३९ मृत्यूंपैकी ७२ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ४५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२ मृत्यू धुळे ७, जळगाव ३, ठाणे ३, पुणे ३, सोलापूर २, वाशिम १, अहमदनगर १, बीड १ आणि बुलढाणा १ असे आहेत.
ADVERTISEMENT