Women’s Day Special: अमृता फडणवीस म्हणतात, ट्रोलर्सना मी का घाबरू?

मुंबई तक

• 02:58 AM • 08 Mar 2021

राजकारणाशी संबंध येणा-या महिला कितीही स्ट्रॉंग असल्या, खंबीरपणे आपलं काम करणा-या असल्या तरी त्यांचा शब्द हा त्यांच्या यजमानांच्या शब्दाखाली दबलेला असतो असं कधी कधी दिसून येतं. पण माझ्याबाबतीत असं कधीच घडलं नाही. वैयक्तिक आयुष्यात ना मी कधी हिपोक्रेसी पाळली, ना सोशल मीडियावर. माझं सोशल मीडिया मी स्वत: हाताळते. तिथलं प्रत्येक मत, विचार माझे स्वत:चेच असतात. […]

Mumbaitak
follow google news

राजकारणाशी संबंध येणा-या महिला कितीही स्ट्रॉंग असल्या, खंबीरपणे आपलं काम करणा-या असल्या तरी त्यांचा शब्द हा त्यांच्या यजमानांच्या शब्दाखाली दबलेला असतो असं कधी कधी दिसून येतं. पण माझ्याबाबतीत असं कधीच घडलं नाही. वैयक्तिक आयुष्यात ना मी कधी हिपोक्रेसी पाळली, ना सोशल मीडियावर. माझं सोशल मीडिया मी स्वत: हाताळते. तिथलं प्रत्येक मत, विचार माझे स्वत:चेच असतात. मुख्य म्हणजे ते खरे असतात. कुठलाही मुखवटा नाही, आड पडदा नाही. मी ख-या आयुष्यात जशी आहे, तशीच मी तिथेही व्यक्त होत असते. त्यामुळे मी जर काही चुकीचं करत नाही, तर ट्रोलिंगला घाबरायचं कशाला?, माझ्या पुरता हा प्रश्न मी असा सोडवला आहे.

हे वाचलं का?

महिला दिन विशेष: ‘होम मिनिस्टर’ फिट तर कुटुंब सुपरहिट!

कर नाही त्याला डर कशाची, हा सवाल मी स्वत:च स्वत:ला विचारत राहते आणि माझ्यावर होणा-या ट्रोलिंगचा सामना करते. इतरांनाही मी हाच सल्ला देते की, तुम्ही मुळात खंबीर रहा. स्वत:वर विश्वास ठेवा. मुख्य म्हणजे गोष्टी सकारात्मकतेने घ्या.

कारण, सोशल मीडिया ही अशी जागा आहे जिथे आपल्याला कोणी वंदो वा निंदो, सगळ्यासाठी आपण कायम तयार राहायला हवं. आपल्या मतांवर ठाम राहायला हवं. त्यातूनही जर सहन होतच नसेल, तर मग ही जागा तुमच्यासाठी नाही. मग, इथे येऊच नये. दुबळे असाल तर सोशल मीडिया तुमच्यासाठी नाही असं धरून चाला.

माझ्याबाबतीत ट्रोलिंग होतं, प्रत्येक वेळी गाणं रिलीज केल्यावर त्यावर टीका केल्या जातात. अगदी चारित्र्यहनन करणा-याही कमेंट असतात. पण त्या सगळ्या वाईट कमेंट या राजकीय हेतूने केलेल्या पेड कमेंट असतात, हे ही मला ठाऊक आहे. पुरोगामी महाराष्ट्रातली लोकं माझ्या कलेचा, विचारांचा आदरच करतात. त्यांच्याकडून कौतुकच केलं जातं. त्यामुळे चांगलं ते घेऊन, वाईटाकडे मी दुर्लक्ष करते. अर्थात दुर्लक्ष करते म्हणजे खूपच खालच्या पातळीवर कमेंट करणार्‍या फेक अकाउंट्सना सोडते,असंही अजिबात नाही. त्यांची तक्रार मी सायबर सेलमध्ये केलेली आहे. त्यातूनच हा खुलासा झालाय की ही अकाउंट्स पेंड आणि खोटी आहेत. पण काहीही असो, ह्या सगळ्या वाईट कमेंट्सचा मी माझ्या मनावर, कामावर कधीच परिणाम होऊ देत नाही.

मला वाटतं प्रत्येक महिलेने हेच करणं अपेक्षित आहे. चांगलं तेवढंच लक्षात ठेऊन वाईटाला आपल्या निर्धातून आणि कृतीतून उत्तर द्यायला हवंय. महिलांच्या सायबर सुरक्षेसाठीचे नियमही अधिक कठोर व्हायला हवेत. त्यासाठी कठोर शिक्षा व्हायला हव्यात. तसं होऊ शकलं तरच ती निर्भयपणे सोशल मीडियावर व्यक्त होऊ शकेल.

सगळयात महत्त्वाचं म्हणजे आपली सोशल मीडियाची इमेज कशी ठेवायची हे आपण ठरवायचंय. सोशल मीडियावर आपल्याला आपण कसे हवे आहोत त्यानुसार आपण आपल्यावर बंधनं घालावीत. त्यानुसार आपण आपले नियम ठरवावे. मी जशी आहे, तशीच जरी सोशल मीडियावर व्यक्त होत असले तरी प्रत्येकाने आपले त्यासाठीचे नियम ठरवावे. आपल्यानुसार आपण आपली वॉल रंगवावी, मुख्य म्हणजे बिलकुल न घाबरता आपल्या नियमांवर इथे वावरावं.

महिला दिनाबाबत :

महिला दिन म्हणजे वेगळं काय आहे? आपण एक घटका मागे वळून पाहतो आणि आत्मविश्वास पुन्हा जागृत करतो. महिलांनी केलेल्या प्रगतीचं कौतूक करतो. मग हे करण्यासाठी एक वेगळा दिवस कशाला हवा? निदान महिलांनी तरी रोजच आपल्या प्रगतीकडे, वाटेतल्या प्रत्येक टप्प्याकडे डोळसपणे पाहायला हवंय. रोजच महिला दिन असल्यासारखं रोजच तिने स्वत:ला वागवायला हवंय. आत्ताच्या घडीला महिला म्हणून सुरक्षिततेत आणखी वाढ व्हावी, ही मागणी मला सगळ्यात महत्त्वाची वाटते. हिंगणघाटची घटना, पूजा चव्हाणची घटना हे त्याचंच उदाहरण आहे की, याबाबत अधिक कठोर नियम असायला हवेत. या मुद्द्याला दुय्यम प्राथमिकता असून चालणारच नाही. कारण जोवर सुरक्षित वाटणार नाही, तोवर मनमोकळेपणाने व्यक्त होता येणार नाही आणि प्रगतीच्या रस्त्यातला हा एक मोठा अडथळाच राहिल. त्यामुळे सुरक्षितता हा सर्वात मोठा मुद्दा आहे, जो अजूनही काहीसा दुर्लक्षित आहे, असं मला वाटतं.

माझ्या आदर्श:

मी कोणाला फॉलो करते तर, सगळ्यात पहिलं नाव अर्थात माझी आई. तिने आजवर ज्या पद्धतीने तिच्या आयुष्याला आकार दिलाय, एक आई म्हणून, बाई म्हणून ज्या प्रकारे अडथळ्यांमधून वाट काढत प्रवास केलाय, त्याचा मला कमालीचा अभिमान आहे. ते सगळं माझ्यातही झिरपावं असं मला कायम वाटतं.

आई व्यतिरिक्त दुसरी अशी व्यक्ती जिला मी फॉलो करते, त्या म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन. प्रत्येक आघाडीवर त्या ज्या प्रकारे लढत असतात ते अफाट आहे. त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि अतिशय महत्त्वाचं पद भूषवत असतानाचं राजकारणातलं आयुष्य याचा समतोल त्या ज्या पद्धतीने राखतात ते शिकण्यासारखं आहे, असं मला वाटतं.

या सगळ्यांकडे पाहून आजच्या दिवशी इतकंच वाटतं की, स्वत:वर विश्वास असणं प्रचंड महत्त्वाचं आहे. त्याच्याशी आपण स्वत: एक बाई म्हणून तडजोड करू नये. जर हे आपल्याला जमलं तर काहीच अशक्य नाही. मग अगदी सोशल मीडिया ट्रोलर्सनाही घाबरायची गरज नाही.

    follow whatsapp