मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याची माहिती समोर आली आहे. उद्या सकाळी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. ज्या आमदार, नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे, अशा नेत्यांना फोन करण्यात आला आहे. त्यांना मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे तातडीने बोलावण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी उद्या सकाळी बैठक होणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजप यांच्या आघाडीचं सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. मात्र, महिना लोटल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यानं सरकार टीकेचं धनी ठरत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आला आहे. आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास ९० मिनिटं चर्चा झाली. या चर्चेत मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल आणि पावसाळी अधिवेशनाबद्दल महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर हालचालींना वेग आला असून, उद्या सकाळी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे मंगळवारी (९ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
14 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाण्याची शक्यता
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर आणखी एक माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात 14 जणांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. यात राज्यातील प्रत्येक विभागातून एका आमदाराला मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं.
ज्या आमदार नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे, त्यांना फोन गेल्याची माहिती मिळाली आहे. या आमदारांना तातडीने मुंबईला येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी सकाळी ९ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे, अशी माहिती मिळतेय.
शिंदे गट आणि भाजपतून ‘यांना’ मिळू शकते मंत्रिमंडळ विस्तारात संधी
मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्तारात सुरूवातीला १२ जण शपथ घेणार असून, त्यात वरिष्ठ नेत्यांनाच संधी दिली जाणार आहे. मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते, अशा संभावित नावांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांच्या नावाचा समावेश आहे. तर शिंदे गटातून गुलाबराव पाटील, सदा सरवणकर, दीपक केसरकर, तानाजी सावंत यांच्या नावांची चर्चा आहे.
ADVERTISEMENT