लाइव्ह

Maharashtra live News : बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

06 Mar 2024 (अपडेटेड: 06 Mar 2024, 07:56 PM)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यात महायुतीचं जागावाटप निश्चित होऊ शकतं, असं सांगितलं जात आहे. दुसरीकडे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांची वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहे. वाचा ताजे अपडेट्स...

manoj jarange patil case file

बीडमध्ये मनोज जरांगे पाटील आणि इतर 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

follow google news

Maharashtra Lok Sabha Seats Sharing news in Marathi : महाराष्ट्रातील दोन्ही राजकीय आघाड्यांचा (महायुती आणि महाविकास आघाडी) लोकसभेच्या 48 जागांचा पेच अजूनही सुटलेला नाही. त्यात दोन्ही आघाड्यातील मित्रपक्ष एकमेकांच्या जागांवर दावे करत आहेत. त्यामुळे कोणती जागा कुणाकडे जाणार याची उत्सुकता ताणली गेली आहे... या संदर्भातील ताजे अपडेट्स वाचा मुंबई Tak लाईव्हमध्ये...

महाविकास आघाडी बैठक अपडेट्स... पहा व्हिडीओ

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 07:56 PM • 06 Mar 2024
    बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल

    बीड जिल्ह्यात विनापरवाना रॅली काढून जीसीबीने फुलं उधळल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे आणि पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर आणि पेठ बीड मध्ये मनोज जरांगे यांच्यासह इतर 12 जणांवर देखील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मनोज जरांगे पाटील हे काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांचं ठीक ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुल उधळून स्वागत करण्यात आलं तर स्वागतासाठी मोठी गर्दी देखील जमवण्यात आली होती. तसेच धोकादायक पद्धतीने जेसीबीचा वापर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. 

  • 06:36 PM • 06 Mar 2024
    जागावाटपाबाबत काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

    महाविकास आघाडीतील किती जागा कुणाला मिळतील, किंवा प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला किती जागा मिळतील हे कोऑर्डिनेशन कमिटीच्या माध्यमातून ठरवण्यात येईल. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा जागा वाटल्या जातील आणि उमेदवारांची घोषणा होईल, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

  • 06:34 PM • 06 Mar 2024
    भाजप आणि मित्रपक्षांच्या जागावाटपासंबंधी बैठक

    भाजप आणि मित्रपक्षांच्या जागावाटपासंबंधी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि प्रविण दरेकर हे भाजप नेते दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • 06:33 PM • 06 Mar 2024
    अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याची धमकी

    अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या व्हॉट्सॲप नंबरवर जीवे मारण्याची धमकी देणारा ऑडिओ संदेश पाठवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

  • 06:12 PM • 06 Mar 2024
    फडणवीस, बावनकुळेंसह भाजप नेते दिल्लीत

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम फैसला दिल्लीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते दिल्लीला गेले आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक असून, या बैठकीत महाराष्ट्रातील उमेदवारांबद्दल आणि महायुतीच्या जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय होऊ शकतो.

  • 12:30 PM • 06 Mar 2024
    'आता संसदेतूनच आवाज उठवणार', वडेट्टीवारांची कन्या लढवणार लोकसभा

    विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. बाळू धानोरकर हे गेल्यावेळी या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांचं निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली. या जागेसाठी प्रतिभा धानोरकर यांचं नाव चर्चेत असतानाच आता शिवानी वडेट्टीवारांनी पोस्ट केली आहे. 

    शिवानी वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, "गेल्या सात वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करत असताना खरे तर मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करायची होती. मात्र लोकशाही संपवू पाहणाऱ्या ह्या सरकारने जिल्हा परिषद निवडणुकाच घेतल्या नाही. त्यामुळे आता संसदेतूनच आवाज उठवणार!"

    पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे की, "लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, सोनिया गांधीजी संघर्ष करत असताना मी देखील त्यात खारीचा वाटा उचलत आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन, मोर्चे काढून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना सोडविण्याचा प्रयत्न केला. कामगार, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींसाठी आवाज उठवला आणि त्यांना न्याय मिळवून दिला. विविध स्पर्धा आणि उपक्रमाच्या माध्यमातून युवा वर्गाला पक्षाशी जोडले."

    "संसदेत काँग्रेस पक्षाचा आवाज मजबूत करण्यासाठीच ज्येष्ठांपासून ते नवमतदारांचा मला उमेदवारी करण्यासाठी आग्रह आहे. म्हणूनच पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी देण्याचा अधिकार सर्वस्वी पक्षाकडे असून त्यांचा निर्णय मला मान्य असेल", अशी भूमिका मांडत वडेट्टवारांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. 

    शिवानी वडेट्टीवार यांनी केलेल्या या ट्विटमुळे प्रतिभा धानोकर यांचा पत्ता कट होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
  • 11:10 AM • 06 Mar 2024
    भाजप अजित पवारांना तीन जागा

    अमित शाहांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातच जागा मिळण्याची शक्यता आहे. बारामती, शिरूर किंवा मावळ आणि रायगड या जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत सोडल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

  • 10:02 AM • 06 Mar 2024
    तुमचा त्या 'दुचाकी' कॅबिनेटची आग झाली होती - अंबादास दानवे

    देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी एक सवालही केला आहे. 

    दानवे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, "संभाजीनागरचे नामांतर तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये केले म्हणता, देवेंद्रजी? मग २०१४ ते २०१९ सालात आपण मुख्यमंत्री होतात तेव्हा का हा निर्णय झाला नाही?" 

    "शिवसेनेने किमान डझनभर आंदोलने केली होती, त्यात तुमचे भाजपवाले मागच्या रांगेत घोषणा द्यायचे. ज्यांनी नामांतराला विरोध केला त्या काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन हे नामांतर उद्धवसाहेबांनी करून दाखवले म्हणून तुमचा त्या 'दुचाकी' कॅबिनेटची आग झाली होती", असा टोला दानवेंनी लगावला.  

    "लोकांना हे माहिती आहे की कोणी नामांतर केलं. ती चिकलठाणा विमानतळाच्या नामांतराची फाईल शेठजींच्या काखेतून का सुटत नाही? हे पण जरा सांगा..", असा सवाल दानवेंनी फडणवीसांना केला आहे. 

    अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका.
  • 09:31 AM • 06 Mar 2024
    शिवसेना, राष्ट्रवादीचे उमेदवार भाजपच्या तिकिटावर लढणार?

    मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री अमित शाह यांची मंगळवारी (५ मार्च) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठका पार पडल्या.

    सुरुवातीला अमित शाह आणि तिन्ही नेत्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे झालेली बैठक जवळपास अर्धा तास चालली.

    त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सह्याद्रीहून निघून गेले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि अमित शहा यांच्यात सुमारे पंचेचाळीस मिनिटे चर्चा झाली.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश जागांवर एकमत झाले आहे. भाजप जवळपास 32 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ जिंकण्याच्या क्षमतेच्या आधारावर जागा मिळतील, ज्यासाठी त्यांना काही जागांची देवाणघेवाण करावी लागेल आणि आवश्यकता भासल्यास कमळ चिन्हावर त्यांचे उमेदवार उभे करावे लागतील.

follow whatsapp