राज्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राजकीय पक्षांकडून घवघवीत यशाचे दावे केले जात आहे. अनेक नेते आकडेमोड करत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र असून, या निकालावर भाष्य करताना शिवसेनेनं भाजपवर पुन्हा एकदा टीकेचे बाण डागले आहेत.
ADVERTISEMENT
शिवसेनेनं सामना अग्रलेखातून स्थानिक स्वराज्य संस्थातील पोटनिवडणुक निकालांचं विश्लेषण करताना भाजपवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेत सर्वाधिक 22 जागा जिंकल्याबद्दल अभिनंदनही केलं आहे.
काय म्हटलंय अग्रलेखात?
‘महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या सोयीने या निकालांचे अर्थ लावीत आहे. आम्हीच कसे ‘मोठे’ किंवा लोकांनी आमच्याच डोक्यावर कसा विजयाचा मुकुट ठेवला असे सांगण्याची चढाओढ सुरू आहे. त्या चढाओढीत भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असली तरी कागदावरील निकालांचे आकडे खोटे बोलत नाहीत. पंचायत समिती निवडणुकांत राज्यातील महाविकास आघाडीने 144 पैकी 73 जागांवर विजय मिळविला. भाजपास 33 जागा जिंकता आल्या. आता गणितात कोणत्या आर्यभट्टाने किंवा भास्कराचार्याने 73 पेक्षा 33 आकडा मोठा असे सिद्ध केले ते ‘सरशी’वाल्यांनी सांगावे’, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
‘जिल्हा परिषद निवडणुकांतही महाविकास आघाडीस 46 तर भाजपला 22 जागा मिळाल्या. आता 46 हा आकडा भाजपच्या 22 पेक्षा दुप्पट असे कोणताही ‘गणिती’ सांगेल. इतिहासाचे धडे बदलले जात आहेत तसे बीजगणित, भूमितीची प्रमेयेसुद्धा बदलली जात आहेत काय? या काही सरसकट निवडणुका नव्हत्या हे समजून घेतले पाहिजे. न्यायालयाच्या निर्णयामुळे या निवडणुकांना सामोरे जावे लागले. महाविकास आघाडीला पालघर, नागपुरात, धुळे-नंदुरबारला चांगले यश मिळाले.’
‘धुळ्यात भाजपला विजय मिळाला. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपापले गट राखले. काही नव्याने जिंकले. नंदुरबारला आदिवासी मतदारांनी भाजपला धक्का दिला. नागपुरात काँग्रेसने आघाडी घेतली. असे चढउतार झाले आहेत. आता भारतीय जनता पक्षाचे म्हणणे असे की, त्यांचा पक्ष हा सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष आहे. ते खरेच आहे. भाजपने 22 जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या व त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला संकोच वाटू नये’, असं सांगत शिवसेनेनं भाजपचं अभिनंदन केलं आहे.
‘महाराष्ट्रातील एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून भाजपने आपली ताकद दाखवली आहे. भाजपने 22 जागा जिंकल्या याचे दुःख वाटायचे कारण नाही, पण भाजपने या पोटनिवडणुकांत अनेक जागा गमावल्या आहेत त्याचे काय? विधानसभा निवडणूक निकालातही भाजप हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यांचे 105 आमदार निवडून आले, पण 105 आमदार असलेला भाजप आता एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहे. तेव्हा जिल्हा परिषद-पंचायत समिती पोटनिवडणुकांच्या निकालाचे विश्लेषण म्हणा किंवा पंचनामा म्हणा, कुणाला काय करायचा तो करू देत, पण विरोधी पक्षाचे म्हणणे जनता मनावर घेणार नाही’, असा इशारा शिवसेनेनं भाजपला दिला आहे.
‘देशातले वातावरण भाजपविरोधी झाले आहे. उत्तर प्रदेशातील मंत्रीपुत्राने ज्या निर्घृणपणे शेतकऱ्यांना चिरडून मारले, त्याचा धक्का सगळ्यांनाच बसला आहे. महाराष्ट्रातला शेतकरीही चिंतेत आहे. निसर्गाचा तडाखा आहेच, पण महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकारनेही हात आखडता घेतल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. या सगळ्यांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करीत आहे’, असं मत शिवसेनेनं मांडलं आहे.
‘भाजपची धोरणे सरळ सरळ शेतकरीविरोधी आहेत. भाजप शेतकऱ्यांशी सूडाने वागत आहे. हा सूड शेतकऱ्यांचे मुडदे पाडण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचला हे काही माणुसकीचे लक्षण नाही. काँग्रेसने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपला मात दिली. अकोल्यात ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीचा वरचष्मा राहिला. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ताब्यातील नरखेड पंचायत समितीवर भाजपने चढाई केली. प्रत्येक जय-विजयाची स्वतंत्र कारणे आहेत’, असा मुद्दा शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
‘जिल्हा परिषद – पंचायत समिती पोटनिवडणुकांत महाविकास आघाडीची सरशी नक्कीच झाली, पण अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढूनही भाजपला पुढे जाता आले नाही. याचा अर्थ असा की, जनतेने भाजपला जमिनीवरच ठेवले आहे. भाजपने महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही. भ्रष्टाचाराचे, अफरातफरीचे बेफाम आरोप ते करीत राहिले. ईडी, सीबीआय, आयकरवाल्यांचा राजकीय वापर करून मंत्र्यांवर व आघाडीच्या नेत्यांवर दबाव टाकले. तरीही भाजपला फार धावता आले नाही. महाविकास आघाडीने बाजी मारली हे मान्य करायला मनाचा मोठेपणा लागतो. राज्यातील विरोधी पक्षाकडे तेवढे विशाल मन उरले आहे काय?’, असा सवाल करत शिवसेनेनं भाजपला चिमटा काढला आहे.
ADVERTISEMENT