देशातल्या नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडणार आहे हा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने जाहीर केला आहे. मान्सून संदर्भातला हा पहिला अंदाज आहे. देशभरातले नागरिक उकाड्याने आणि उन्हाच्या तीव्रतेने हैराण झाले आहेत. अशात एक चांगली बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT
यंदा देशात पाऊस सामान्य राहील असंही हवामान शास्त्र विभागाने म्हटलं आहे. तसंच पाऊस चांगला पडणार असल्याचा अंदाज आल्याने देशातला शेतकरीही सुखावणार यात काहीही शंका नाही. दरवर्षी शेतकरी हवामान खात्याचा अंदाज काय येतो आहे याची वाट बघत असतात. आज हवामान शास्त्र विभागाने अंदाज जाहीर केला आहे आणि तो चांगला अंदाज आहे त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधी पडणाऱ्या पावसाचा अंदाजही भारतीय हवामान खात्याने जाहीर केला. हा पहिला अंदाज आहे. एकूण पावसाच्या ७४ टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीत पडत असतो. पाऊसमान चांगलं होणार असल्याचा अंदाज आल्याने सामान्य नागरिकही सुखावले असून बळीराजाही सुखावला आहे. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनामुळे त्रस्त झालं होतं. आता अनलॉक झालं आहे. गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रातलेही निर्बंध संपले आहेत. महागाई, वाढतं तापमान या दोन्हीमुळे जनता त्रस्त आहे. एवढंच नाही तर वाढतं उन आणि उन्हाच्या झळा यामुळेही लोक वैतागलेत. अशा सगळ्यात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
स्कायमेट या खासगी संस्थेनेही देशभरातील यंदाच्या मान्सूनचा अंदाज जाहीर केला होता. यंदाचा मान्सून सामान्य असेल असं स्कायमेटने म्हटलं होतं. या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या काळात देशात ९८ टक्के पाऊस पडेल असं म्हटलं गेलं होतं. २१ फेब्रुवारीलाही स्कायमेटने अंदाज जाहीर केला होता त्यात मान्सून सामान्य असेल असं स्पष्ट केलं होतं.
ADVERTISEMENT