महाराष्ट्राला सीरियस मुख्यमंत्र्यांची गरज आहे वेळ पडल्यास दोन मुख्यमंत्री नेमा असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राजकारण रंगतं आहे. मंगळवारी दिवसभर याबाबतचे पडसाद राजकीय पटलावर उमटले. त्या पाठोपाठ आता बुधवारीही सरकारवर टीका होताना दिसते आहे.
ADVERTISEMENT
फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? राज ठाकरेही आक्रमक
नेमकं काय म्हणाल्या आहेत सुप्रिया सुळे?
फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं आणि मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की त्यांनी सगळ्या गणेश मंडळांमध्ये जावं, उत्सव साजरे करावेत पण महाराष्ट्राकडेही गांभीर्याने बघावं. मी सातत्याने म्हणते आहे तेच आज म्हणते की महाराष्ट्राला सीरीयस आणि फोकस्ड मुख्यमंत्र्यांची गरज आहे. वेळ पडल्यास या सरकारने दोन मुख्यमंत्री नेमावेत असा खोचक सल्लाही सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
फॉक्सकॉन-वेदांताचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यामागे मोदी सरकार?
मोदी सरकारचा कट
गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत, अशा वेळी महाराष्ट्रतला जवळपास लाखभर रोजगार देणारा हा प्रकल्प गुजरातला जाणं हा केंद्र सरकारचा म्हणजेच विद्यमान मोदी सरकारचा कट आहे असाही आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. महाराष्ट्राचं आणि मुंबईचं महत्त्व कमी केलं जातं आहे.
शिंदे गटाचे सगळे निर्णय दिल्लीतून होतात
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सरकार महाराष्ट्रात आलं. मात्र त्यांना या गोष्टीचा विसर पडला की छत्रपती कधीच दिल्ली दरबारी झुकले नाहीत. हे सरकार मात्र सातत्याने तेच करतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. एक काळ असा होता की शिवसेनेकडे भाजप यायचा. आता शिंदे गटाचे सगळे निर्णय दिल्लीतून होतात. काहीतरी नवं कल्चर महाराष्ट्रात येतं आहे. हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हटलं आहे सुप्रिया सुळेंनी?
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न करावेत असं म्हटलं आहे त्या पत्राचा सरकारने जरूर विचार करावा असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
”दोन वर्षांपूर्वी वेदांता कंपनीला ज्या सवलती द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या होत्या. परंतु नेमकं दोन वर्षांमध्ये त्याचा फॉलोअप घेतला गेला नाही. आता याबाबत केंद्र सरकार आणि अग्रवाल हे कंपनीच्या मालकांसोबत बातचीत करून तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करू.” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT