एकनाथ शिंदेंनी शरद पवारांनाही टाकलं मागे; इतिहासातील राजकीय भूकंप पुन्हा चर्चेत

मुंबई तक

• 04:57 PM • 22 Jun 2022

मुंबई: शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांचा दावा करत शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाळीने महाविकास आघाडी सरकार हादरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाषणात बंड केलेल्या आमदारांना भावनिक साद घातली आहे. परंतु आता वेळ निघूण गेली म्हणत एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव धुडकावला आहे. शिंदेंच्या या […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांचा दावा करत शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाळीने महाविकास आघाडी सरकार हादरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाषणात बंड केलेल्या आमदारांना भावनिक साद घातली आहे. परंतु आता वेळ निघूण गेली म्हणत एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव धुडकावला आहे. शिंदेंच्या या बंडानं आता राज्याच्या इतिहासातील बंडांची चर्चा रंगू लागली आहे. एकनाथ शिंदेंचे हे बंड अगदी शरद पवारांनी केलेल्या बंडापेक्षाही मोठं आहे. राज्याच्या राजकारणात आतापर्यंत कोणते मोठे बंड झाले हे आपण जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

नारायण राणेंचे शिवसेना-काँग्रेस विरोधात बंड

३ जूलै २००५ रोजी नारायण राणेंनी (Narayan Rane) शिवसेना सोडली आणि २० दिवसातच ते महाराष्ट्राच्या विधानसभेतून बाहेर पडले. शिवसेनेकडून मुख्यमंत्री पद उपभोगलेल्या राणेंनी शिवसेना सोडणं हा बाळासाहेबांसहित संपूर्ण शिवसेनेला धक्का मानला जात होता. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंमुळे आपण पक्ष सोडतोय असे म्हणत ११ आमदारांसह त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. राणे ४० आमदारांना घेऊन बाहेर पडतील असा दावा केला जात होता परंतु, बाळासाहेंबांनी तो प्रयत्न हाणून पाडला.

शिवसेनेनंतर राणे काँग्रेसमध्ये दाखल झाले. २००५ ते २०१७ पर्यंत त्यांनी काँग्रेसचे काम केले. महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषवले होते. परंतु आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा शब्द देण्यात आला होता, तो पाळला गेला नाही म्हणून मी पक्ष सोडतोय असे म्हणत राणेंनी काँग्रेसलाही सोडचिठ्ठी दिली. २०१७ मध्ये राणेंनी आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला. स्वाभिमानी पक्ष नावाचा राणेंचा पक्ष जास्त दिवस तग धरु शकला नाही. कालांताराने त्यांनी तो पक्ष भाजपमध्ये विलीन केला. आणि आता भाजपच्या तिकीटावर खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री आहेत.

जेव्हा शरद पवारांनी पाडलं वसंतदादांचं सरकार

देशात आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये दोन गट पडले. एक गट इंदिरा गांधींसोबत होता तर दुसरा गट रेड्डी काँग्रेस यांच्यासोबत. यशवंतराव चव्हाणांसह महाराष्ट्रातील अनेक नेते रेड्डी गटासोबत गेले. १९७८ मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि वसंतदादा पाटलांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन झाले. परंतु हे सरकार साडेचार महिने चालले.

वसंतदादा पाटलांच्या नेतृत्वात सरकारमध्ये असंतोष होता, त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) आपल्या ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यानंतर १९७८ मध्येच शरद पवारांनी पुरोगामी लोकशाही दलाकडून मुख्यमंत्री झाले. ३८ व्या वर्षी सर्वात तरुण वयात मुख्यमंत्री झालेले शरद पवार हे पहिलेच मुख्यमंत्री होते. दिड वर्षांहून अधिक हे सरकार चालले. पुढे १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.

छगन भुजबळांनीही शिवसेनेला ठोकला होता रामराम

शिवसेनेच्या बंडाची ही पहिलीच वेळ नाही. १९९१ मध्ये छगन भुजबळांनी पहिले बंड केले होते. १९९१ मध्ये राज्यात सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी छगन भुजबळांनी नाशिकमध्ये बंडाची तलवार उगारली होती.

छगन भुजबळांनी त्यावेळी शिवसेनेच्या ५४ आमदारांपैकी १८ आमदरांना घेऊन शिवसेनेला रामराम केला होता. राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि महात्मा फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपण्णी केल्यानंतर छगन भुजबळ नाराज झाले होते त्यानंतर त्यांनी शिवसेनेला सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून गेली अनेक वर्ष झालं छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत.

    follow whatsapp