कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा झालेला शिरकाव आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाट सुरू झाल्यानंतर राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरत असून, शालेय शिक्षण विभागाने सोमवारपासून शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. तसा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला असून, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दलची माहिती दिली. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं धडक दिल्यानंतर राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यात सर्वात आधी मुंबई महापालिकेनं कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन हा निर्णय घेतला होता. त्यानंतर अनेक महापालिका आणि विविध जिल्हा प्रशासनाने शाळा बंद केल्या होत्या.
राज्यात सध्या ४० हजारांच्या आसपास कोरोना रुग्ण आढळून येत असले, तरी कोरोनामुळे शाळा बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शिक्षणतज्ज्ञांबरोबरच पालकांकडूनही शाळा सुरू करण्याची मागणी होत असून, आता शालेय शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. त्यामुळे सोमवारपासून राज्यातील शाळांमध्ये किलबिलाट ऐकायला येऊ शकतो.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रस्तावाबद्दलची माहिती दिली. ‘मोठ्या प्रमाणात शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांकडून शाळा सुरु करण्याची मागणी होतेय. ज्याठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल, त्या त्या भागातील स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून शाळा सुरु ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला जावा. तसे अधिकार दिले जावे, याबाबतचा प्रस्ताव मुख्ममंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.’
‘सोमवारपासून शाळा सुरू करण्यात याव्यात, असा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवलेला असून, रुग्णसंख्याही कमी होत असल्याचं दिसत आहे. ही सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे पालक सतत शाळा सुरू करा, अशी मागणी करत आहेत. नियम धुडकवून काहीही करणं चुकीचं आहे, पण मुख्यमंत्र्यांचा निर्णय येऊ द्या’, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
‘शिक्षकांच्या दोन्ही लसी पूर्ण करण्याबरोबरच लसीकरणावर अधिक भर देणार आहोत. आरोग्य विभागाशी यासंबंधी चर्चा करण्यात येईल. शाळेत लसीकरण केंद्र झालं, तर लवकर लसीकरण पूर्ण होईल. रात्रशाळांच्या बाबतीतही निर्णय घेण्यात येईल,’ असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
ADVERTISEMENT