– योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती जवळपास निवळली असून, दैनंदिन रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. कोरोना संसर्गाचा वेग कमी झाल्यानं निर्बंध हटवले जाणार अशी चर्चा राज्यात सुरू आहे. दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही निर्बंध हटवण्याबद्दल माहिती दिली आहे. महिनाअखेरीस महाराष्ट्र अनलॉक होईल, असं वडेट्टीवार म्हणाले.
राज्यातील कोरोना परिस्थिती आणि निर्बंध हटवण्यासंदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात मुंबईपासून कोरोना संक्रमणाला सुरुवात झाली होती. आता परिस्थिती निवळत आहे आणि महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करीत आहे.’
महाराष्ट्रात मास्क मुक्तीचा निर्णय झालाय का? अजित पवारांनी थेट दिलं उत्तर, म्हणाले…
‘कोरोनाचे निर्बंध शिथिल केले जात असले, तरी मास्क मुक्ती मात्र होणार नाही. मुंबईनंतर राज्यभर कोरोनाचे संक्रमण वाढले होते. सर्वप्रथम मुंबईतच रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे मुंबईत निर्बंध शिथिल करण्यात आले. टप्याटप्याने राज्याच्या इतरही भागांत ही कार्यवाही करण्यात येणार आहेत’, अशी माहिती मंत्री वडेट्टीवार यांनी दिली.
‘या महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पुर्णत: अनलॅाक होण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं कमी होते आहे. महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात येत आहे. नागपूरात मात्र आठवडाभरासाठी निर्बंध तसेच राहणार आहेत. अनलॅाक होत असताना मास्कमुक्त महाराष्ट्र होणार नाही. प्रत्येकाने मास्क घालणं गरजेचं आहे’, असं आवाहनही त्यांनी केलं.
…तर राज्यातील निर्बंध हटवणार; राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
‘अनलॉक करताना चौथ्या लाटेचीही चिंता आहे. चौथी लाट ओमिक्रॅानपेक्षा जास्त वेगानं वाढणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे’, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.
नागपुरात अधिवेशनाचा निर्णय 15 फेब्रुवारीला
‘विधिमंडळ समिती नागपुरात येऊन गेली आहे. पण अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घ्यायचं की नाही, याबद्दल समितीचा निर्णय झालेला नाही. येत्या 15 फेब्रुवारी रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यावेळी याबद्दल निर्णय घेतला जाईल,’ अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
ADVERTISEMENT