भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. हे सरकार नापास आहे, त्यामुळे मुख्यमंत्रीही नापास आहेत अशा शब्दांमध्ये त्यांनी ही टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यातल्या सर्व पातळ्यांवर नापास झालं आहे असंही त्या म्हणाल्या आहेत. बीड या ठिकाणी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे. आत्तापर्यंत पंकजा मुंडे या उद्धव ठाकरेंच्या विरोधात थेट काही बोलल्या नव्हत्या आता मात्र त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
महाविकास आघाडी सरकारचं विश्लेषण करायचं म्हटलं की लोक उद्धव ठाकरे यांच्याबाबत चांगला विचार व्यक्त करतात. मात्र महाविकास आघाडी सरकारबाबत चांगला विचार करत नाहीत. ठाकरे सरकार सगळ्याच पातळ्यांवर नापास झालं आहे. तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे या सरकारमध्ये गोंधळ सुरू आहे. राज्य सरकार नापास म्हटल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही नापास झाले आहेत. अशा तीव्र शब्दांमध्ये त्यांनी ही टीका केली आहे.
आणखी काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
या सरकारमध्ये एका पक्षाला सर्वाधिक फायदा होतो आहे. मुख्यमंत्री एका पक्षाचे असले तरीही सरकार दुसराच पक्ष चालवतो आहे. सर्वाधिक निधी हादेखील राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतो आहे. त्यामुळे लाल फितीचा कारभार वाढला आहे हेच दिसून येतं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकही नवीन योजना, लोकप्रिय योजना आत्तापर्यंत आली नाही. कोरोनाचं कारण दिलं जातं आहे मात्र आता कोरोना संपला आहे तरीही जनतेच्या हिताचं काम हे सरकार करत नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
२०१९ मध्ये राज्यात कधीही शक्य वाटला नव्हता असा महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग झाला. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवायचं म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे हे या सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत. अशात सरकार स्थापनच्या पहिल्या दिवसापासून भाजपकडून या सरकारवर टीकेचे बाण चालवले जात आहेत. पंकजा मुंडे यांनीही या सरकारवर आधीही टीका केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव कधीही घेतलं नव्हतं. आता मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नापास झाले आहेत अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
ADVERTISEMENT