लैंगिक शोषणाच्या प्रकरणात मुंबईतल्या न्यायालयाने एका व्यक्तीला दीड वर्षांचा कारवास सुनावला आहे. एका अल्पवयीन मुलीला हा तरूण आयटम असं म्हणाला होता. आयटम असं म्हणून या तरूणाने तिचा विनयभंग केला असा आरोप या तरूणावर आहे. जेव्हा एखाद्या मुलीला उद्देशून आयटम हा शब्द वापरला जाईल तेव्हा हे त्या मुलीचं लैंगिक शोषण मानलं जाईल असं म्हणत न्यायालयाने या तरूणाला दीड वर्ष कारवासाची शिक्षा सुनावली आहे.
ADVERTISEMENT
नेमकी काय घडली घटना?
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार मुंबईतल्या POSCO न्यायालयाने २६ वर्षीय व्यावसायिकाला १६ वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणी दोषी ठरवलं आहे. २०१५ मध्ये आरोपीने शाळेतून परतणाऱ्या या मुलीचे केस ओढले आणि क्या आयटम कहाँ जा रही है असा उल्लेख केला. आरोपी लैंगिक हेतूने या मुलीचा पाठलाग करत होता. एक महिन्यापासून तो तिचा पाठलाग करत होता असंही न्यायालयात सांगण्यात आलं.
आरोपीची माफीची याचिका कोर्टाने फेटाळली
समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीच्या चांगल्या वागणुकीमुळे माफीची याचिका फेटाळून लावताना विशेष न्यायाधीश एस. जे. अन्सारी यांनी हे भाष्य केलं की महिलांना अपमानकारक आणि अन्यायकारक वागणुकीपासून वाचवण्यासाठी अशा गुन्ह्यांमध्ये कठोरपणे कारवाई करणं आवश्यक आहे. अशा रोडसाईड रोमिओंना धडा शिकवणं आवश्यक आहे. एका १६ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार आरोप असलेल्या व्यावसायिकाला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. मुलीच्या पालकांना तरूणाने त्यांच्या मुलीसोबत केलेली मैत्री आवडत नसल्यामुळे त्यांना या प्रकरणी अडकविण्यात आलं होतं. या अल्पवयीन मुलीला जुलै महिन्यातच न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
मुलीने कोर्टाला नेमकं काय सांगितलं?
या प्रकरणातल्या एकमेव साक्षीदार असलेल्या अल्पवयीन मुलीनं न्यायालयात सांगितलं की १४ जुलै २०१५ ला दुपारी १.३० च्या सुमारास शाळेत जात होते. त्यावेळी आरोपी ती ज्या गल्लीतून जाते तिथेच मित्रांसोबत होता. मुलीने हे सांगितलं की २.१५ च्या सुमारास ती शाळेतून परतली तेव्हाही आरोपी दुचाकीवर बसला होता. त्याने मला पाहताच तो माझ्या मागे आला आणि माझे केस ओढून मला आयटम असं म्हणाला. असे या मुलीने कोर्टात सांगितलं.
आरोपीने असे वर्तन माझ्यासोबत केल्यानंतर मी त्याला दूर ढकललं आणि असं करू नकोस म्हणून ओरडले. त्यानंतर मला आरोपीने शिव्या देण्यास सुरूवात केली. त्यावर आरोपी म्हणाला की मी हवे तसं करेन. अल्पवयीन मुलीने लगेच १०० हा नंबर डायल केला. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत आरोपी पळून गेला होता. यानंतर मुलीने या घटनेची माहिती वडिलांना दिली. या सगळ्यानंतर आता या तरूणाला न्यायालयाने दीड वर्षांच्या कारवासाची शिक्षा सुनावली आहे.
ADVERTISEMENT